नागपूर Maha Cake : भारत हा जगातील सर्वात तरुण देश तर आहे पण जगात तरुण मतदारांची सर्वाधिक संख्या देखील भारतात आहे. नवीन तरुणांना मताची किंमत कळावी या उद्देशानं प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर (Chef Vishnu Manohar) यांनी 15 बाय 5 फूट आकाराचा केक तयार केला. नवमतदारांनी ‘माझे पहिले मत देशासाठी’ असा नारा देत हा ‘केक’ कापून लोकशाहीचा जागर केलाय. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी पहिल्यांदाचं मतदान करणाऱ्या युवावर्गासाठी केक पार्टी आयोजित केलं होतं.
मतदानाचे महत्त्व कळावं : देशाला अत्यंत कठीण परिस्थितीत स्वातंत्र्य मिळाले आहे. ही लोकशाही टिकवून ठेवायची असेल तर प्रत्येकानेचं देशासाठी मतदान केले पाहिजे. तरुणांमध्ये मतदानाचे महत्त्व कळावे, या उद्देशाने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
15 बाय 5 फूट आकाराचा केक : शेफ विष्णु मनोहर यांनी पहिल्यांदाचं मतदान करणाऱ्या युवावर्गासाठी 15 बाय 5 फूट इतक्या आकाराचा केक तयार करुन ‘केक पार्टी’चं आयोजन केलं होतं. एरवी वाढदिवसाला ‘केक’ कापून आनंदोत्सव साजरा केला जातो. पण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकानं आपला मतदान हक्क बजावून लोकशाहीच्या या आनंदोत्सवात सहभागी व्हावं, या उद्देशानं शेफ विष्णू मनोहर यांच्यावतीनं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
नवमतदारांच्या हस्ते कापला केक : नवमतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशानं जिल्हाधिकारी आणि नागपूर जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून शेफ विष्णु मनोहर यांना ‘एसव्हीप आयकॉन (SVEEP ICON)’ म्हणून नामनिर्देशित करण्यात आलं आहे. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल आणि नवमतदारांच्या हस्ते केक कापून या ‘केक पार्टी’चं उद्घाटन करण्यात आलं.
मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे : डॉ. रविंद्र सिंगल म्हणाले की, "विष्णू मनोहर यांनी राबवलेला हा ‘केक पाटी’चा उपक्रम प्रशंसनीय आहे. मागील निवडणुकीत 54 टक्के मतदान झाले होते. त्यात वाढ व्हावी या उद्देशानं यावेळी विविध उपक्रम राबवले जात असून त्याच शृंखलेतील हा उपक्रम आहे. मतदान केलं की, तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार मिळतो. तेव्हा अवश्य मतदान करा," असा सल्लाही डॉ. रविंद्र सिंगल यांनी दिलाय.
हेही वाचा -