नागपूर : जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध व ख्यातनाम विक्रमवीर शेफ विष्णू मनोहर यांनी 24 तासात तब्बल 14 हजार 174 डोसे तयार केले असून त्यांनी नवा विश्वविक्रम केलाय. यापूर्वी विष्णू मनोहर यांनी 25 विक्रम केले होते. हा त्यांचा 26 वा विक्रम ठरलाय. रविवारी (27 ऑक्टोबर) सकाळी 8 वाजता शेफ विष्णू मनोहर यांनी डोसे बनवायला सुरुवात केली होती. साधारपणे 6 हजार डोसे तयार होईल, असा त्यांचा अंदाज होता. मात्र, खवय्यांच्या प्रतिसादामुळं आज (28 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजेपर्यंत त्यांनी 14 हजारांपेक्षा अधिक डोसे तयार करून नवीन किर्तीमान रचला आहे.
विष्णू मनोहर यांची प्रतिक्रिया : विष्णु मनोहर यांनी यापूर्वी अयोध्येत 7 हजार किलोचा 'राम हलवा', सर्वात मोठा व्हेज कबाब, सर्वात मोठापराठा, सर्वात मोठी पुरणपोळी, 52 तास नॉन-स्टॉप कुकिंग मॅरेथॉन व यासह 25 विश्वविक्रम त्यांनी आपल्या नावे केले आहेत. खवय्यांच्या उत्साह आणि प्रतिसादामुळं हा उपक्रम पूर्ण होऊ शकला, अशी प्रतिक्रिया विष्णू मनोहर यांनी दिली. "मला खूप आनंद झालाय. आजचा हा विश्वविक्रम मी माझ्या संपूर्ण स्टाफला समर्पित करतो. त्यांच्याशिवाय हे शिवधनुष्य पेलणं मला शक्य झालं नसतं. दरवर्षी, अशी वेगळी दिवाळी माझ्या हातून घडो, अशी देवाचरणी प्रार्थना करतो," असं ते म्हणाले.
डोसा खाण्यासाठी रांगा : विष्णू मनोहर यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी 24 तास खवय्यांच्या रांगा लागल्या होत्या. विष्णू जी की रसोईचा परिसर खवय्यांच्या गर्दीनं फुलून गेला होता. एकीकडे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर डोसे तयार करत होते, तर दुसरीकडे लोकांनी डोसा खाण्यासाठी रांगा लावल्याचं चित्र पाहायळा मिळालं.
दोन विश्वविक्रमांची नोंद : रविवार सकाळी 7 वाजता विष्णू मनोहर यांनी 'न थांबता 24 तास डोसे बनविणे' व '24 तासात सर्वाधिक डोसे बनविणे' असे दोन विश्वविक्रमांची नोंद झाली आहे.
500 किलो घोळ, 1 हजार किलो चटणी आणि 5 हजार केळीची पानं : विष्णू मनोहर यांना 14 हजार 174 डोसे तयार करण्यासाठी 500 किलोहून अधिक डोस्याचा घोळ उपलब्ध करून दिला. तर डोस्यांसोबत खाण्यासाठी 1 हजार किलो चटणीचा वापर करण्यात आला. दक्षिण भारतीय पदार्थ असलेला डोसा केळीच्या पानावर वाढला जातो. या उपक्रमात जळगावचे मनिष पात्रीकर यांनी 5 हजार हून अधिक केळीच्या पानांचा वापर केला.
गरमा-गरम डोसे खाण्यासाठी खवय्यांची गर्दी : विष्णू जी की रसोईच्या परिसरात तयार करण्यात आलेल्या गिरीशभाऊ गांधी खुलं रंगमंचावर 3 वेगवेगळ्या भट्टयांवर 3 तवे ठेवण्यात आले हेाते. प्रत्येक तव्यावर एकावेळी विष्णू मनोहर हे 8-8 डोसे तयार करीत होते. तयार झालेले गरमा-गरम डोसे खाण्यासाठी खवय्ये रांगा लावायचे. तर समोर बाल रंगभूमीचे छोटे कलाकार आपल्या सुमधूर गीतांनी वातावरण अधिक प्रसन्न, जीवंत करण्यात गुंतलेले होते.
12 तासामध्ये 8 हजार 500 हजार डोसे तयार : विष्णू मनोहर यांनी 24 तासात 5 हजार डोसे तयार करण्याचे जाहीर केले होते. परंतु लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे त्यांनी 12 तासामध्ये 8 हजार 500 हजार डोसे तयार झाले. त्यासाठी संपूर्ण तयारी ही आधीच करण्यात आली होती.
मान्यवरांनी घेतला स्वाद : विष्णू मनोहर यांनी तयार केलेल्या डोस्यांचा स्वाद माजी खासदार विजय दर्डा, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, कारागृह अधीक्षक वैभव आगे, सलील कुलकर्णी, संदीप जोशी, अभिलाष पांडे जबलपूरचे आमदार, ज्ञानेश्वर रक्षक, हेमंत गडकरी आदी मान्यवरांनी घेतला.
हेही वाचा