अमरावती : सातपुडा पर्वत रांगेत सालबर्डी परिसरात असणाऱ्या एका गुहेत प्राचीन असं शिवलिंग आहे. या शिवलिंगाचं वैशिष्ट्य म्हणजे नंदीचं मुख शिवलिंगाकडं नसून शिवलिंग आणि नंदी दोन्हीही उत्तर दिशेकडं पहात आहेत. या शिवलिंगाची मुक्ताबाईंनी 1300 वर्षापूर्वी पूजा केली. या ठिकाणी मुक्ताबाईंकडं महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी जेवण करायला आले असता, त्यांनीदेखील या शिवलिंगाचं दर्शन घेतलं अशी अख्यायिका सांगितल्या जाते.
शिवलिंग आणि नंदीचं असं आहे वैशिष्ट्य : सातपुडा पर्वत रांगेत दुर्गम ठिकाणी मुक्ताबाईचं मंदिर आहे. मुक्ताबाईच्या या मंदिरात मागच्या बाजुला एका गुहेत प्राचीन शिवलिंगाचं दर्शन होतं. या शिवलिंगाचं वैशिष्ट्ये म्हणजे, सध्या केवळ शिवलिंगाच्या वरच्या गोलाकार भागाचं दर्शन या ठिकाणी होते. या शिवलिंगाच्या अगदी बाजुला मात्र शिवलिंगाकडं मुख नसणारा नंदी आहे. दगडाचा हा अतिशय जुना नंदी कर्नाटकातील शिवालयात आढळणाऱ्या नंदीप्रमाणं भासतो. या नंदीच्या कानांचा आकार वरच्या बाजुला टोकदार स्वरूपाचा आहे. कानाच्या आत अतिशय रेखीव, कोरीव काम केलं असून नंदीच्या पाठीवर असणारी गादी दगडात सुबक अशा कोरीव कामानं तयार केलेली दिसते. सालबर्डी परिसर आणि लगतच्या अमरावती जिल्ह्यात अशा स्वरूपाचा नंदी कुठल्याही मंदिरात आढळत नाही.
महानुभाव पंथाचं महत्त्वाचं ठिकाण : ज्या ठिकाणी पुरातन शिवलिंग आणि नंदी आहे, ते ठिकाण आज मुक्ताबाईचं स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. महानुभाव पंथामध्ये मुक्ताबाईचं महत्व अनन्य साधारण असं मानलं जाते. शिवलिंगाच्या गुहेसमोर हेमाडपंथी शैलीतलं मंदिर उभारण्यात आलं असून या मंदिरात मुक्ताबाईची मूर्ती प्रतिष्ठित करण्यात आली. या शिवलिंगाची आराधना करूनच मुक्ताबाईंना महादेव प्रसन्न झालेत. त्यांनी मुक्ताबाईला तुझा उद्धार करण्यासाठी या परिसरात चक्रधर स्वामी येतील, त्यावेळी त्यांचा आदर सत्कार कर, असं सांगितलं असल्याची मान्यता महानुभाव पंथामध्ये आहे.
चक्रधर स्वामींनी मुक्ताबाईंकडं केलं अन्नप्राशन : "सालबर्डी लगत सातपुडा पर्वत रांगेत अनेक वर्ष तप करणारे श्री चक्रधर स्वामी यांची भेट ज्यावेळी मुक्ताबाईंशी झाली, त्यावेळी मुक्ताबाईंनी त्यांना निवासस्थानी भोजनासाठी बोलावलं. यावेळी हातापायाची नखं ओबडधोबड वाढली होती आणि डोक्यावरील केसही मोठे झाले होते. आपल्या निवासस्थानी आलेल्या श्री चक्रधर स्वामींचे पाय धुवून मुक्ताबाईंनी ते आपल्या डोक्याच्या केसांनी पुसले आणि त्यांना स्वतः शिजवलेले कंदमुळं जेवायला वाढलेत. मुक्ताबाईंनी दिलेलं जेवण ग्रहण करण्यापूर्वी चक्रधर स्वामींनी मुक्ताबाईचे निवासस्थान असणाऱ्या गुहेमध्ये शिवलिंगाचं दर्शन घेतलं," अशी माहिती मुक्ताबाई मंदिरातील पुजारी शेषराव रासेगावकर यांनी, 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
या परिसरात 'अशा' आल्यात मुक्ताबाई : "सालबर्डी लगतचा परिसर सातपुडा पर्वतरांगेनं वेढला असून या ठिकाणी आज देखील घनदाट जंगल आहे. मुक्ताबाई या भरतृहरी राज्याचा भाऊ विक्रमादित्य यांची पत्नी होत्या. एके दिवशी त्या आंघोळ करत असताना एक भिक्षुक त्यांच्या दारी भिक्षा मागण्यासाठी आला. भिक्षुकाला वाट पहावी लागू नये म्हणून त्या आंघोळ करत होत्या त्याच अवस्थेत भिक्षा घेऊन बाहेर आल्या. राणीचं असं रूप पाहून भिक्षुकानं पळ काढला आणि राणी भिक्षा देण्यासाठी त्याच्या मागं गेली. राणी मुक्ताबाई जेव्हा भानावर आली, तेव्हा तिला आपण निर्वस्त्र घरून धावत निघालो हे लक्षात आलं. आपण आता घरी परतायचं नाही, असा निश्चय करून मुक्ताबाई या थेट जंगलात पोहोचल्या. सालबर्डी लगत गुहेमध्ये त्यांनी 1300 वर्ष महादेवाची तपश्चर्या केली," अशी अख्यायिका असल्याची माहिती सालबर्डी येथील रहिवासी रितेश नांदगावकर यांनी दिली.
हेही वाचा :
- 100 कोटी वर्षांपूर्वीच्या गुहेत 2 हजार वर्षांपासून केली जातेय 'अंबादेवी'ची पूजा; जाणून घ्या पौराणिक कथा
- सातपुड्यात 'पांडव कचेरी'; घनदाट जंगलात पुरातत्व खात्यानं जपलाय ऐतिहासिक वारसा - Pandava Kacheri
- इमादशाही राजवटीत उभारला 'हौज कटोरा'; सव्वा पाचशे वर्षे जुन्या इमारतीवर इराणी शैलीची छाप - Houj Katora Amravati