मुंबई CET Score Percentile Mismatch : महाराष्ट्रात सीईटी परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचा दावा ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद केला होता. तसेच जोपर्यंत गोंधळ सुटत नाही तोपर्यंत अभियांत्रिकी प्रवेशाला स्थगिती द्यावी, अशी मागणी सरकारकडे आदित्य ठाकरे यांनी केली होती. दरम्यान सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन सीएटी परीक्षेबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया संगणकाधारित आणि केंद्रीय पद्धतीने राबविले जाणाऱ्या देशात महाराष्ट्र पहिले राज्य असून अशी पद्धती केंद्र सरकारने स्वीकारलीय. परीक्षा पद्धत मानव हस्तक्षेपरहीत असल्यामुळे पूर्णपणे पारदर्शकच असल्याचं म्हणत विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन सीईटी सेल आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी केले आहे.
37 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल : सीईटी सेल आयुक्त दिलीप सरदेसाई म्हणाले की, "सामाईक प्रवेश परीक्षा 22 एप्रिल, 2024 ते 30 एप्रिल, 2024 (पीसीबी ग्रुप) आणि दिनांक 02 मे, 2024 ते 16 मे, 2024 (पीसीएम ग्रुप) या कालावधीत एकूण 169 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. पीसीबी ग्रुपसाठी 12 सत्रात तर पीसीएमसाठी 18 सत्रात परीक्षा पार पडली. 330988 विद्यार्थी, 394033 विद्यार्थिनी तर 31 ट्रान्सजेंडर उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. सदर परीक्षा ऑनलाईन पध्दतीनं घेण्यात आली. यापैकी 6 लाख 75 हजार 377 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. उमेदवाराचे एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे असल्यास त्या प्रश्नाला ऋण गुण (Negative Marks) देण्याची पध्दत नाही. हा निकाल पर्सेंटाईल पद्धतीने घोषित करण्यात आलेला आहे. 37 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल मिळाले आहे."
पालक वर्ग गोंधळलेला असल्याचा दावा : "सीईटी परीक्षा देणाऱ्यांचे बरेच पालक येतायत आणि ते मार्क संदर्भात गोंधळलेले आहेत; मात्र सीईटी सेल कार्यक्षम आणि पारदर्शकपणे काम करत असल्याचं", सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी म्हटले आहे. याविषयी ज्यांनी ई-मेलनं प्रश्न पाठवले. त्यांना उत्तरं दिली आहेत तसेच मार्क, पर्सेंटाईल संदर्भात त्यांचे निराकरण केले आहे. तसेच आम्ही आता पालकांच्या भूमिकेत आलो असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच विद्यार्थ्यांना त्यांची उत्तरपत्रिका बघण्यासाठी तांत्रिक बाबी पूर्ण करून २७ आणि २८ जून रोजी सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध केल्या जाणार आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या खोट्या प्रचारासंदर्भात आम्ही कारवाई करणार आहोत. त्यामुळे खोट्या क्लिपला बळी पडू नका, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. आम्ही या संदर्भात संवेदनशील असून सायबर विभागाकडे याविषयी तक्रार करणारा असून कारवाईची मागणी करणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
सगळ्यांना एक समान न्याय देता यावा - शैलेंद्र देवळणकर : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एमएचटी-सीआयटी मधील पर्सेंटाइल पद्धती बंद करून गुणांवर आधारित मेरीट पद्धत अवलंबावी अशी मागणी केली होती. यावर बोलताना शिक्षण संचालक शैलेंद्र देवळणकर म्हणाले की, "सगळ्यांना एक समान न्याय देता यावा यासाठी ही पद्धती आहे. आम्ही तुमच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना संदेश देण्यासाठी आपल्यासमोर आलो आहे. 7 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. परीक्षा देण्याची पद्धती ही ऑनलाइन पॅटर्न 2020 पासून सुरू आहे. म्हणजेच पॅटर्न 5 वर्षांपासून सुरू आहे. हाच पॅटर्न फक्त राज्य सरकार नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर, जेईई परीक्षा होते त्याठिकाणी तशीच पद्धती वापरली जाते. उच्च न्यायालयाने देखील हा पॅटर्न एन्डोर्स केला होता. त्यात आपण थोडी सुधारणा केली गेली आहे. त्यामुळे या परीक्षेत कोणत्याही प्रकारे अनागोंदी कारभार झाला नाही."
सीईटी परीक्षेबाबत राजकारण नको : शिक्षण संचालक शैलेंद्र देवळणकर पुढे म्हणाले की, "पर्सेंटाईल पद्धत एकसमान न्याय देण्यासाठी असते. मल्टिपल बॅचमधून मुलांना घ्यावं लागतं. त्यामुळे ही पद्धत अवलंबवली जाते. त्यामुळे एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं शक्य नाही. त्यासाठी बॅचची साईज वाढवली जात आहे. यंदा ही संख्या २८ हजारांपर्यंत गेली. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कम्प्युटरची आवश्यकता असते. याला कम्प्युटर्स तंत्रिकदृष्ट्या अवगत असतात. त्याला लॅन देखील लागते. आपण हा इन्फ्रा देखील वाढवत आहे. राॅ स्कोअर त्यानंतर आपण वापरू शकू जेव्हा बॅचची संख्या वाढेल. त्यामुळे कोणीही राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये. त्या पलिकडे जाऊन विचार व्हायला हवा", अशी अपेक्षा शैलेंद्र देवळणकर यांनी व्यक्त केली आहे. तसेच "आम्ही पारदर्शकतेसाठी तुमच्या समोर आलो आहोत. आम्ही तुमच्यासाठीच उपलब्ध राहणार असल्याचंही", शैलेंद्र देवळणकर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा:
- मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर लक्ष्मण हाकेंचं उपोषण अखेर मागे, मंत्री छगन भुजबळांसह शिष्टमंडळानं घेतली भेट - Chhagan Bhujbal
- अवघे पाऊणशे वयमान, पण कीर्ती किती महान..., 75 वर्षीय पुष्पा चौधरी यांची क्रीडा क्षेत्रातील आगळीवेगळी कहाणी - Amravati News
- 'ओबीसी आंदोलन सरकारसोबत मॅनेज; आमच्या नोंदी रद्द केल्या तर महागात पडेल', मनोज जरांगे यांचा इशारा - Maratha Reservation