पुणे IAS Pooja Khedkar : परिविक्षाधिन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंबही अडचणीत सापडलं आहे. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी हातात पिस्तूल घेत शेतकऱ्याला धमकवल्याचा व्हिडिओ समोर आला. याप्रकरणी आता पुण्यातील पौड पोलीस स्टेशनमध्ये खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूजा खेडकरच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल : पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडीओमध्ये त्या एका शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून धमकावत असल्याचं दिसत होतं. याचप्रकरणी त्यांच्यावर पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोरमा खेडकर यांच्यासह (रा.नँशनल हाउजिंग सोसाइटी बाणेर पुणे), दिलीप खेडकर (रा.नँशनल हाउजिंग सोसाइटी बाणेर पुणे), अंबादास खेडकर (रा. आंबी ता हवेली पुणे) त्यांच्या सोबत आलेल्या काळ्या कपड्यांमधील अनोळखी दोन पुरूष, दोन महिला आणि इतर गुंड लोक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पंढरीनाथ कोंडीबा पासलकर (रा.मु पो केडगाव, आंबेगाव पुनवर्सन ता. दौड जि.पुणे) यांनी तक्रार दिली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण ? : याबाबत अधिक माहिती अशी की, पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी सरकारी नोकरी करत असताना कोट्यवधी रुपयांची संपत्ती कमावली. त्यातून त्यांनी अनेक ठिकाणी जमीन घेतली आहे. मागील वर्षी 5 जून 2023 रोजी मुळशी तालुक्यातील धडवली येथील सर्व्हे नं.12/1 मध्ये शेजारच्या शेतकऱ्याच्या जमिनीवर देखील अतिक्रमण करण्याचा प्रयत्न खेडकर कुटुंबियांकडून करण्यात आला. तेव्हा पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर बाऊन्सर घेऊन तिथं पोहचल्या. त्यांनी हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्याला धमकावल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. आता या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी पोलिसांनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा
- IAS पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; ऑडी कार दुसऱ्याच्या नावावर; चौकशीसाठी समिती स्थापन - IAS Pooja Khedkar
- IAS पूजा खेडकर यांच्यावरील आरोपानंतर विद्यार्थ्यांचा संताप; संसदेत चर्चा करण्याची मागणी - IAS Pooja Khedkar
- आयएएस पूजा खेडकरांच्या आईची पिस्तूल घेऊन दमदाटी, व्हिडिओ व्हायरल झाल्यावर दिलं स्पष्टीकरण - IAS Pooja Khedkar