अमरावती Melghat Bus facility : सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मेळघाटच्या घनदाट जंगलात एकूण 314 गावं वसली आहेत. या गावातील आदिवासी बांधवांच्या सुविधेसाठी रोज एकूण 17 ते 18 एसटी महामंडळाच्या बस धावतात. यापैकी काही गाड्या परतवाडा आगारातून निघतात. जंगलातील अनेक भागात अतिशय खडतर असणाऱ्या भागात प्रवाशांना सुविधा देणाऱ्या एसटी बसच्या चालकासह वाहकाला सलग दोन दिवस जंगलातील दुर्गम गावात मुक्काम करावा लागतोय. मेळघाटातील धारणी तालुक्यात येणाऱ्या अतिशय दुर्गम भागात वसलेल्या कोकमार्क या ठिकाणी मुक्कामी असणाऱ्या एसटी बसच्या चालक वाहकांसोबत 'ईटीव्ही भारत'नं संवाद साधला असता त्यांनी मेळघाटातील खडतर प्रवासाबाबत आपलं मत व्यक्त केलंय.
तीन दिवसात सहाशे किलोमीटर प्रवास : मेळघाटातील धारणी तालुक्यात येणाऱ्या अतिशय दुर्गम गावापर्यंत जाणाऱ्या एसटी बसचा प्रवास हा परतवाडा आगारातून रोज सकाळी परतवाडा येथून आठ वाजता निघणारी एसटी बस ही धारणीला साडे अकरा वाजता पोहोचते. त्यानंतर पंधरा मिनिटांनी ही गाडी मेळघाटातील अतिशय उंच ठिकाण असणाऱ्या गोलाईला सव्वा बारा वाजता पोहोचते. गोलाई गावातून निघालेली बस पुन्हा धारणीला आल्यावर सायंकाळी सव्वा पाच वाजता हरिसाल मार्गे खोकमार या अतिदुर्गम भागात वसलेल्या गावात सायंकाळी साडेसात ते 'आठ'च्या दरम्यान पोहोचते. याच ठिकाणी गाडीचा मुक्काम असतो. त्यानंतर ही गाडी सकाळी साडेसहा वाजता खोकमार येथून निघाल्यावर हरिसल मार्गे पुन्हा धारणीला जाते. धारणी येथून 20 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सावली खेडा या गावात ही गाडी सलग दोन फेऱ्या मारते. त्यानंतर सायंकाळी ती भवर या दुर्गम गावात पोहोचते. या ठिकाणी पुन्हा या गाडीचा मुक्काम असतो. तिसऱ्या दिवशी भवर येथून ही गाडी धारणीला आल्यावर सकाळी बैरागडला शाळकरी मुलांच्या सुविधेसाठी धावते. वैरागड वरून पुन्हा धारणीला आल्यावर ती हरिसाल, तारूबांदा, घोंगडा मार्गे धामणगाव गढी येथून सायंकाळी सहा वाजता परतवाडा आगारात पोहोचते. सुमारे 58 तासांच्या या प्रवासात जवळपास 600 किलोमीटरचा प्रवास या गाडीचा होतो.
रस्त्याचं काम शून्य : चौराकुंड, चौपन, खोकमार हा 14 किलोमीटरपर्यंतचा मार्ग मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक एक अंतर्गत मंजूर झालं आहे. त्यासाठी 612 लक्ष रुपय मंजूर झालं असून कामाचं भूमिपूजन 2022 23 मध्ये अचलपूरचे आमदार बच्चू कडू तसंच मेळघाटचे आमदार राजकुमार पाटील यांनी केलं होतं. भूमिपूजन झालं असलं, तरी या मार्गाचं काम मात्र, अद्यापही सुरू झालेलं नाही. हे काम लवकर सुरू व्हायला हवं, असं चौराकुंड येथील रहिवासी सुरेश सावलकर यांनी ईटीव्ही भारतची बोलताना म्हटलं आहे.
मेळघाटात दोन तालुके मात्र आगार नाही : अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तसंच धारणी या दोन तालुक्यांमध्ये सातपुडा पर्वतरांगेत मेळघाट व्यापला आहे. चिखलदरा तसंच धारणी या दोन्ही तालुक्यांमध्ये राज्य परिवहन महामंडळाचं एकही आगार नाहीय. त्यामुळं या भागात धावणाऱ्या एसटी बसच्या वाहक,चालकांना त्रास सहन करावा लागतोय.
चालकासह वाहकाचा जंगलात मुक्काम : परतवाडा ते मेळघाट ही एसटी बस पहिल्या दिवशी संध्याकाळी 7.30 ते 8 च्या दरम्यान खोकमार येथे मुक्कामाला थांबते. वास्तविक हरिसाल येथून खोकमाच्या दिशेनं एसटी बस निघाल्यावर 22 किलोमीटर अंतरावर येणाऱ्या चौराकुंडच्या पुढं पक्का रस्ता नाहीय. या मार्गावरून जड वाहनां व्यतिरिक्त साध्या चार चाकी गाड्या देखील जाणं अशक्य आहे. त्यामुळं खडतर प्रवास करत बस अंधारातच खोकमारला पोहोचते. पाचशे ते सहाशे लोकसंख्या असणाऱ्या या गावाला चारी बाजूंनी टेकड्यांनी वेढलेलं आहे. त्यामुळं रात्री गावात भयान शांतता असते. इथेच वाहकासह चालकाला बसमध्ये रात्र काढावी लागते. गावात असणाऱ्या एका हात पंपावरून पाणी आणून ते बसध्येच जेवण करतात. सकाळी साडेसहा वाजता पुन्हा बस खोकमार गावातून धारणीच्या दिशेनं निघते. "आमच्यासाठी हा प्रवास नेहमीचाच झाला असून साठ रुपये भत्ता आम्हाला मिळतो. मेळघाटची ही तीन दिवसांची ट्रिप झाल्यावर दोन दिवस परतवाडा लगतच्या गावांमध्ये बसण्याची ड्युटी लागते. आठवड्यातून एक दिवस सुट्टी राहते", असx बसचालक शरद भुयार यांनी सांगितलं. दिवसभरात सातशे ते आठशे रुपये कलेक्शन या मार्गावर होतं, असं वाहक संदीप निरापुरे यांनी सांगितलं. चालकाच्या हिमतीमुळं जंगलातील हा प्रवास करण्याचं धाडस होतं, असं देखील संदीप निरापुरे म्हणाले.
आदिवासी बांधवांसाठी गाडी फायद्याची : खोकमार, चौपन, चौराकुंड या दुर्गम गावातील रहिवाशांना हरिसालच्या बाजारात येण्यासोबतच धारणी येथे काही काम असल्यास ही गाडी अतिशय महत्त्वाची ठरते. या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी देखील ही बस फायद्याची आहे. गोलाई, घोंगडा, वैरागड, तारूबांदा या मेळघाटातील विविध टोकावर अतिशय दुर्गम ठिकाणी वसलेल्या गावांमधील रहिवासी, विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी ही गाडी अतिशय महत्त्वाची आहे.
अशा आहेत अडचणी : मेळघाटातील आदिवासी बांधवांना सुविधा देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ पूर्ण प्रयत्न करीत आहे. मेळघाटात महामंडळातर्फे रोज 17 ते 18 बस फेऱ्या मारल्या जातात. धारणीलगत कुसुम कोट या ठिकाणी आगारासाठी जागा निश्चित केली आहे, मात्र यासाठी लागणारी कोट्यावधीची रक्कम राज्य परिवहन महामंडळाकडं नाही. शासनानं यासाठी आर्थिक मदत करावी म्हणून स्थानिक आमदार, खासदारांनी शासन दरबारी पाठपुरावा केला. धारणी येथे आगाराची व्यवस्था झाली, तर मेळघाटात बस फेऱ्या वाढण्याची शक्यता आहे. तसंच वाहक आणि चालकांना मुक्कामाची योग्य सुविधा देखील उपलब्ध होईल, असं अमरावती विभागाचे नियंत्रक निलेश बेलसरे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
वाहक, चालकांना नियमानुसारच जबाबदारी : वाहक आणि चालकांचे कर्तव्याचे तास निश्चित करण्यात आले आहे. 250 किलोमीटरच्यावर बस चालवल्यास चालक, वाहकाला आराम दिलात जातो. मेळघाटात सलग तीन तीन दिवस गाड्या घेऊन जाणारे वाहक,चालक हे देखील अडीचशे किलोमीटरनंतर आराम करतात. मेळघाटातील प्रवाशांच्या सुविधेसोबतच वाहक, चालकांची काळजी घेणे, देखील आमची जबाबदारी असल्याचं निलेश बेलसरे म्हणाले.
'हे' वाचलंत का :
- महाविद्यालय प्रशासनानं घातलेली बुरखाबंदी योग्यच; मुंबई उच्च न्यायालयानं 9 विद्यार्थिनींची याचिका फेटाळली - Mumbai Hijab Controversy
- लोकशाही वाचवण्यासाठी खोकेशाहीला अद्दल घडवा : किशोरी पेडणेकर; तर किरण शेलारांना जिंकण्याचा विश्वास - Graduate Constituency Election 2024
- संसदीय अधिवेशनातून आता मोदींना पळ काढता येणार नाही, कारण...संजय राऊतांचा एनडीएवर हल्लाबोल - SANJAY RAUT News