वाशिम : समृद्धी महामार्गावर कारंजा टोल प्लाजा नजीक उभ्या असलेल्या केमिकलच्या ट्रकला मागील दिशेनं आलेल्या ट्रकनं जोरदार धडक दिली. यामुळे दोन्ही ट्रक जळून खाक झाले. ही घटना आज पहाटे 4 वाजाताच्या दरम्यान घडली. यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसून चालक आणि क्लिनर जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
झारखंडकडं जाणाऱ्या ट्रकची उभ्या ट्रकला धडक : प्राथमिक माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरील कारंजा टोल प्लाझा जवळ बिघाड झाल्यानं पेंट केमिकल घेऊन जाणारा ट्रक उभा होता. यादरम्यान मागील बाजूनं मुंबईवरुन झारखंडकडं जाणाऱ्या ट्रॅकनं उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. यामुळे स्पार्किंग होऊन दोन्ही ट्रकनं पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच कारंजा नगर परिषद अग्निशामक दल तसंच समृद्धी महामार्ग अग्निशामक दल, शिवणी टोल प्लाजा अग्निशामक दल, वनोजा टोल प्लाजा अग्निशामक दल यांच्या मदतीनं आग आटोक्यात आणण्यात आली. परंतु उभ्या असलेल्या ट्रकमध्ये केमिकल असल्यानं स्फोट होत असल्यामुळं जवळपास दीड तास वाहतूक ठप्प झाली.
समृद्धी महामार्गावर अपघाताचं सत्र सुरूच : शासनाचा महत्वाकांशी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गावर वारंवार अपघात होत आहेत. दोन दिवसापूर्वी देखील अपघात झाला होता. यामुळे प्रवाशी वर्गातून चिंता व्यक्त होत आहे.
उभ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका : समृद्धी महामार्गावर वेगानं वाहनं धावतात. या दरम्यान काही वाहनं रस्त्याच्या कडेला उभी असतात. त्यामुळे चालकांना अनेकदा उभ्या वाहनांचा अंदाज येत नाही. तसंच दूरवरील प्रवास असल्यानं चालकांना डुलकी लागून अपघाताच्या घटना घडल्याचे प्रकार वाढत आहेत.
हेही वाचा :