नागपूर Mayawati Nagpur Meeting : आज नागपूरच्या बेझनबाग मैदानावर पार पडलेल्या सभेत मायावतींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कांशीराम यांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्णत्वास नेण्याचं आवाहन नागपूरच्या मतदारांना केलेलं आहे. पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील एकूण लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे. या पाचही ठिकाणी भारतीय समाज पक्षाकडून उमेदवार रिंगणात उतरवण्यात आलेले आहेत. उमेदवारांच्या प्रचाराकरिता आज बसपा प्रमुख मायावतीच्या नागपुरात प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.
काँग्रेसने बाबासाहेबांना भारतरत्न दिले नाही : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वाधिक काळ सत्ता काँग्रेस पक्षानेचं उपभोगली; मात्र देशाचा विकास त्यांनी केला नाही. काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे आम्हाला पुढे यावं लागलं होतं असं मायावती म्हणाल्यात. काँग्रेसने बाबासाहेबांना जिवंतपणी भारतरत्न दिले नाही, असा आरोप मायावती यांनी केला. बाबासाहेबांच्या प्रयत्नाने मंडळ आयोगाच्या शिफारसीनुसार या देशातील मागासवर्गीयांना आरक्षण मिळायला हवं होतं. पण ते देखील काँग्रेसने होऊ दिलं नसल्याचा आरोप मायावतींनी केलाय.
बसपामुळे बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले : ज्यावेळी देशात व्हीपी सिंग सरकार अस्तित्वात येत होतं, त्यावेळी बसपापकडून दोन अटी पुढे ठेवण्यात आल्या होत्या. त्यातील पहिली अट म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देण्यात यावे आणि दुसरी म्हणजे मंडळ आयोग लागू करावा. बसपामुळे देशात मंडळ आयोग लागू झाले आणि बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाल्याचं मायावती म्हणाल्या आहेत.
जुमलेबाजी कामात येणार नाही : या निवडणुकीत जुमलेबाजी अजिबात कामात येणार नाही. सत्ताधाऱ्यांनी गेल्या दहा वर्षांत जनतेला दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नसल्याचा आरोप मायावती यांनी केलाय. केंद्र सरकार केवळ मोठ्या धनदांड्यांसह उद्योगपतींना सूट देण्यातच मग्न असल्याचा आरोप त्यांनी केलाय. आमच्या पक्षानं धनदांडगे आणि उद्योगपतींकडून पैसे घेतले नसल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे.
मागासवर्गीय समाजाचा विकास कसा होईल? : उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाने चार वेळा सरकार बनवलं. त्यावेळी गरिबांचा विकास हा अजेंडा राबवला. मात्र, गेल्या काही वर्षांत गरीब आणि गरिबी वाढत आहे. गरीब, मागासवर्गीय समाजाचा विकास झाला नाही. सरकारी नोकरी मध्येही आरक्षणाचा कोटा पूर्ण केला नाही. तर आता सरकारी काम देखील खासगी क्षेत्राकडे सोपवण्यास सुरुवात केले. त्यामुळे आता या मागासवर्गीय समाजाचा विकास कसा होईल असा प्रश्न मायावती यांनी विचारला आहे.
भाजपा, काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवा : भाजपा सरकारच्या कृषी धोरणांमुळे देशातील शेतकरी संकटात आला. गरिबी आणखी वाढतचं आहे. एवढंच नाही तर अर्थव्यवस्था ही डबघाईला आली आहे. काँग्रेस सरकार काळातसुद्धा दलित आणि मागासवर्गीयांना न्याय मिळू शकला नाही. त्यामुळे भाजपा आणि काँग्रेस सत्तेत येणार नाही याची काळजी बसपा घेईल, असंही मायावती म्हणाल्या आहेत. साम, दाम, दंड, भेद वापरून भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सहकारी सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र तसं आम्ही होऊ देणार नाही असंही मायावतींनी स्पष्ट केलं.
बाबासाहेबांचं स्वप्नं पूर्ण करायचं आहे : केंद्रात आम्हाला संधी मिळाली तर आम्ही इतर पक्षांप्रमाणे हवेत आश्वासनं देणार नाही; मात्र विकास करून दाखवू असं मायावती नागपूरच्या सभेत म्हणाल्या आहे. महाराष्ट्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. तुम्हाला त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे अशी भावनिक साद नागपूरच्या मतदारांना त्यांनी घातली आहे.
हेही वाचा :
- महायुतीच्या जागा वाटपाचे घोंगडे भिजतच; मात्र मनभेद नसल्याचा नेत्यांचा दावा... - Lok Sabha Election 2024
- "शाहू महाराज खरे वारसदार नाहीत"; संजय मंडलिक यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा सतेज पाटलांनी घेतला समाचार - lok sabha election 2024
- "एक पप्पू मेरी जिंदगी में आए"; कंगना रणौतनं उद्धव ठाकरेंना डिवचलं - Kangana Ranaut on Uddhav Thackeray