नाशिक Brutal murder - पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेरी कंपाऊंडमध्ये मध्यरात्री एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाची निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीस आलीय. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रक्ताच्या थारोळ्यात गगन - नाशिकच्या पंचवटी परिसरातील मेरी कंपाऊंड भागात मराठा समाजाच्या वसतीगृहाबाहेर गगन प्रवीण कोकाटे (वय 28) रा. वृंदावन नगर, म्हसरूळ, नाशिक या युवकाची मंगळवार 20 तारखेला मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात संशयितांनी डोक्यात तीक्ष्ण हत्यारानं वार करून हत्या केली. ही घटना सकाळी काही लोकांच्या निदर्शनास आल्यानं उघडकीस आली आहे. याबाबत सकाळी सात वाजेच्या सुमारास काही नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात गगन याचा मृतदेह आढळून आल्यानंतर याची माहिती पंचवटी पोलिसांना दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस निरीक्षक ज्योती आमने यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
प्रेम प्रकरणातून हत्या - यावेळी पोलिसांना गगन याच्या खिशातून एक चिट्ठी मिळाली असल्याची माहिती आणि ही हत्या प्रथमदर्शनी प्रेम प्रकरणातून झाली असल्याचा संशय वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी व्यक्त केला आहे. या हत्येतील मारेकऱ्यांच्या शोधार्थ पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली आहेत.
निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा - काही दिवसांपूर्वी पोलीस सेवेतून निवृत्त झालेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कोकाटे यांचा गगन हा धाकटा मुलगा होता. गगन याची हत्या झाल्याची घटना समजताच नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. तसंच या घटनेमुळं पोलीस वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.