मुंबई - मुंबई 154 वर्षे जुन्या कर्नाक पुलाच्या पुनर्बांधणीची महत्त्वपूर्ण प्रक्रिया सुरू आहे. बृहन्मुंबई महापालिकेने रेल्वे विभागाच्या दक्षिण भागात 516 मेट्रिक टन लोखंडी गर्डर बसवून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठलाय. मशीद बंदर रेल्वे स्थानकाजवळ स्थित आणि पी डी'मेलो रोडला जोडणारा हा पूल दक्षिण मुंबईतील मशीद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली मार्ग भागातील वाहतूक सुरळीत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.
पूल मुंबईकरांच्या वापरासाठी खुला केला जाणार : मिळालेल्या माहितीनुसार, सध्या या पुलाची पुनर्बांधणी सुरू असून, हा पूल 5 जून 2025 पर्यंत बांधून पूर्ण होणे अपेक्षित आहे. या पुलाची बांधणी पूर्ण झाल्यानंतर त्याची चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती पालिकेने दिलीय. या चाचणीनंतर सदर पूल मुंबईकरांच्या वापरासाठी खुला केला जाणार असल्याचं पालिकेनं म्हटलंय. पालिकेच्या माहितीनुसार, या ऐतिहासिक पुलाचे बांधकाम 1867 मध्ये करण्यात आलंय. 2018 मध्ये IIT मुंबईच्या तज्ज्ञांनी हा पूल असुरक्षित घोषित केला होता. त्यानंतर पालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरू केली.
14 जानेवारी 2025 रोजी 'ट्रायल रन' केले जाणार : पालिकेच्या प्रकल्प विभागाचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाक पुलाच्या दुसऱ्या बाजूच्या लोखंडी गर्डरचे 428 मेट्रिक टन वजनाचे सुटे भाग प्रकल्पस्थळावर दाखल पोहोचलेत. तर, उर्वरित सुटे भाग 20 डिसेंबरपर्यंत प्रकल्पस्थळी दाखल होणे अपेक्षित आहे. 13 जानेवारी 2025 पर्यंत गर्डरच्या सुट्या भागांचे जोडकाम करून 14 जानेवारी 2025 रोजी 'ट्रायल रन' केले जाणार आहे. या कालावधीत रेल्वे 'ब्लॉक' मिळाल्यानंतर 19 जानेवारी 2025 पर्यंत गर्डर स्थापित करण्याची कार्यवाही पूर्ण केली जाईल.
3 मे 2025 पर्यंत रस्त्यांचे काँक्रिटीकरण : महापालिकेचे प्रकल्प आयुक्त अभिजित बांगर पुढे म्हणाले की, रेल्वे मार्गावर गर्डर स्थापित करण्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर पुढील कामकाजाचे सूक्ष्म नियोजन करून टप्पेनिहाय किती कालावधी लागेल, याची निश्चिती करण्यात आलीय. त्यानुसार पूर्व आणि पश्चिम दिशेकडील खांब बांधणीचा पहिला टप्पा 15 मार्च 2025 पर्यंत पूर्ण करणे त्यानंतर 17 एप्रिल 2025 पर्यंत खांब उभारणी पूर्ण होणे अपेक्षित आहे. 3 मे 2025 पर्यंत रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि 1 जून 2025 रोजी लोड टेस्ट करण्याचे नियोजन असल्याची माहिती अभिजीत बांगर यांनी दिलीय. या नियोजित वेळापत्रकानुसार, अपेक्षित कार्यवाही पूर्ण झाल्यास 5 जून 2025 पर्यंत कर्नाक पूल वाहतुकीस खुला करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचे बांगर यांनी म्हटलंय.
हेही वाचा :