मुंबई - सध्याची पिढी ही सोशल मीडियाच्या प्रचंड आहारी गेलीय. ही पिढी पुस्तक वाचत नाही. परिणामी वाचन नसल्यामुळं त्यांच्या ज्ञानात भर पडत नाही, अशी एक ओरड सातत्याने ऐकायला मिळते. याच सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या पिढीला आणि वाचनापासून दूर गेलेल्या तरुणाईला वाचन संस्कृतीकडे वळविण्यासाठी मुंबईतील भांडुप येथे पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलंय.
सध्या धकाधकी अन् स्पर्धेच्या युगात जो पुढे जाईल तोच टिकू शकतो, अशी ही जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. त्यामुळं स्पर्धेत टिकण्यासाठी तुमच्याकडे ज्ञान, कला आणि कौशल्य असण्याची नितांत गरज आहे. सध्या दैनंदिन आयुष्यात मोबाईल हा आपला आयुष्याचा एक अविभाज्य घटक झालाय. खरं तर पूर्वी अन्न, वस्त्र, निवारा हे महत्त्वाचे घटक मानले जायचे. परंतु आता अन्न, वस्त्र, निवाऱ्याबरोबर मोबाईलला महत्त्वाचा घटक म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
वाचनातून आनंद अन् ज्ञान मिळतो : भांडुप येथे पाटील प्रतिष्ठानातर्फे पुस्तक प्रदर्शनाचा उपक्रम राबविण्यात आलाय. या ठिकाणी अनेक पुस्तक माफक दरात आणि सवलतीत देण्यात आलीत. काही पुस्तक तर केवळ 100 रुपयांत वाचकांना विकत घेता येणार आहेत. विशेष म्हणजे 6 ते 8 डिसेंबर रोजी पुस्तकांचे देवाण-घेवाण करता येणार आहे. म्हणजे तुमच्याकडील जुनी पुस्तक द्यायची आणि त्या बदल्यात नवीन एक पुस्तक घ्यायची, ही ऑफर येथे दिली जातेय. अगदी माफक दरात पुस्तक मिळत असल्यामुळं पुस्तकप्रेमी आणि वाचकांची सध्या गर्दी पाहायला मिळते. सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या तरुण-तरुणाईला वाचन संस्कृतीकडे वळवण्यासाठी, वाचनातून प्रेरणा अन् ज्ञान मिळवण्यासाठी हे प्रदर्शन भरवलंय. ते अत्यंत आदर्शवादी आहे. वाचनातून आपणाला आनंद मिळतो. पुस्तके आपले मित्र आहेत. वाचन पुस्तक वाचल्याने आपलेपणा जाणवतो. पुस्तक वाचनातून खूप शिकायला मिळतं, अशी प्रतिक्रिया येथे पुस्तके खरेदी करण्यास आलेल्या वाचकांनी आणि वाचकप्रेमींनी दिलीय.
मोबाईलमुळे डोळे खराब होतात : सध्या घराघरात मोबाईल आहे. कॉम्प्युटर, लॅपटॉप आहे. कुटुंबातील लहान मुलं मोबाईलसाठी हट्ट करतात. आई-वडील मुलांच्या प्रेमापोटी मोबाईल देतात. मात्र लहानपणापासूनच मोबाईलच्या स्क्रीनमुळे मुलांच्या डोळ्यावर ताण येतोय. परिणामी सततच्या मोबाईलमुळं डोळे खराब होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. "तुम्ही मोबाईलमधून जे पाहताय किंवा वाचताय. त्याच्यापेक्षा प्रत्यक्ष पुस्तकातून वाचन केल्यास कितीतरी पटीने तुम्हाला आनंद मिळतो. तुमच्या ज्ञानात भर पडते. त्यामुळे मोबाईलमुळे डोळे खराब करून घेण्यापेक्षा आणि आजार वाढवून घेण्यापेक्षा अधिकाधिक पुस्तक वाचली पाहिजेत, यासाठी आम्ही इथे मी माझ्या मुलाला घेऊन आलेत. तसेच इथून पुस्तक विकत घेता येणार आहे. मी अनेक वर्षांपासून पुस्तक वाचत आहे. पुस्तकातून मला आनंद मिळतो," असेही वाचकप्रेमींनी सांगितलंय.
विविध प्रकारची पुस्तकं उपलब्ध : दुसरीकडे हे पुस्तक प्रदर्शन 8 डिसेंबरपर्यंत असणार आहे. विशेष म्हणजे इथे पुस्तक आदान-प्रदान करता येणार आहेत. म्हणजे तुमच्याकडील जुने पुस्तक देऊन नवीन कोणतेही पुस्तक खरेदी करता येणार आहे. त्यामुळे सहा ते आठ डिसेंबर रोजी इथे मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय. इथे सर्व क्षेत्रातील विविध पुस्तक उपलब्ध आहेत. शाळा, कॉलेज, कथा, कादंबऱ्या, कविता, प्रवासवर्णनं, ललित लेख, चारोळ्या आदी साहित्य प्रकारातील विविध पुस्तके येथे उपलब्ध असल्याचं आयोजकांनी सांगितलंय. तसेच काही पुस्तक केवळ 100 रुपये तुम्हाला खरेदी करता येणार आहे. त्यामुळे मोबाईलवरती तासनतास वाया घालवण्यासाठी तरुणांनी थोडा वेळ काढून पुस्तक वाचली तर नक्कीच त्यांच्या ज्ञानात भर पडेल, असेही येथे पुस्तक घेण्यासाठी आलेल्या वाचकप्रेमींनी प्रतिक्रिया दिलीय.
हेही वाचा-