मुंबई Summons to MP Ravindra Waikar : शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई उच्च न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवसेना उबाठाचे पराभूत उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी 2 सप्टेंबरला सुनावणी होईल. त्यामुळे वायकर यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची भीती वर्तवली जात आहे.
वायकर यांची निवड रद्द करण्याची मागणी : अमोल कीर्तिकर यांनी त्यांच्या पराभवात आणि रवींद्र वायकर यांच्या विजयात गोंधळ झाल्याचा आरोप करत ही याचिका दाखल करून वायकर यांची निवड रद्द करावी आणि कीर्तिकर यांना विजयी घोषित करावं, अशी मागणी याचिकेत केली आहे. विजयी उमेदवार रवींद्र वायकर यांना 4 लाख 52 हजार 644 मते मिळाली होती. तर पराभूत उमेदवार अमोल कीर्तिकर यांना 4 लाख 52 हजार 596 मते मिळाली होती. अवघ्या 48 मतांनी वायकर यांच्याकडून कीर्तिकर हे पराभूत झाले होते. कीर्तिकर यांच्याकडून दाखल याचिकेप्रकरणी न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी खासदार वायकर यांच्या सहित मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील सर्व 19 उमेदवारांना समन्स पाठवले आहे.
2 सप्टेंबरला होणार सुनावणी : या याचिकेवर 2 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. यानंतर वायकर व कीर्तिकर दोघांच्या राजकीय भविष्याचा निर्णय होईल. त्यामुळे या प्रकरणाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
याचिकेत अधिकाऱ्यांविरोधात आरोप : अमोल कीर्तिकर यांच्या याचिकेत निवडणूक मतमोजणी प्रक्रियेत गंभीर गडबड झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांकडे त्यांनी फेर मतमोजणीसाठी मागणी केली होती; मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळे त्याचा लाभ वायकर यांना मिळाला आणि त्यांना विजयी घोषित करण्यात आले, असा कीर्तिकरांचा आरोप आहे. अॅड. अमित कारंडे यांच्याद्वारे कीर्तिकर यांनी ही याचिका न्यायालयात दाखल केली आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूने राजकीय आरोप-प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात करण्यात आले.
हेही वाचा :
- अनिल देशमुख-देवेंद्र फडणवीस वादात आता समित कदमांची एन्ट्री, नेमकं काय आहे प्रकरण? - Amit Deshmukh Vs Samit Kadam
- "...तर आज उद्धव ठाकरे जेलमध्ये असते", अनिल देशमुख यांचा मोठा गौप्यस्फोट - Anil Deshmukh Vs Devendra Fadnavis
- "पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कॉल आला अन्..."; हरिभाऊ बागडेंची राज्यपालपदी नियुक्ती झाल्यावर पहिली प्रतिक्रिया - Haribhau Bagade New Governor