मुंबई Health Department Recruitment : ऑक्टोबर 2023 मध्ये विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 31 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तसंच छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयामध्ये 10 रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळं एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली.
आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याचे निर्देश : या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. तेव्हा राज्यातील आरोग्य विभागात दहा हजाराहून अधिक पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यावर न्यायालयानं मार्च 2024 पर्यंत आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.
"आरोग्य विभागातील रिक्त पदांची भरती सरकारच्या म्हणण्यानुसार मार्च 2024 पर्यंत झाल्यास आरोग्य व्यवस्था सुधारण्यास मदत होईल. त्यामुळं सरकारनं त्या दिशेनं पावलं उचलली पाहिजेत." - मुंबई उच्च न्यायालय
सरकारतर्फे 13 हजार कोटी मंजूर : राज्यातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, लहान-मोठी उपकरणे, विविध साधने, साहित्यासाठीही पावले उचलण्यात आल्याचं यावेळी राज्य सरकारच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं. यासाठी सरकारनं एकूण 13 हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यातील दहा हजार कोटींहून अधिक खर्च झाल्याचंही सरकारनं न्यायालयाला सांगितलंय.
"उच्च न्यायालयानं अनेकवेळा सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी तात्काळ भरती करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु सरकार त्यात दिरंगाई करत आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार मार्च 2024 पर्यंत पदे भरण्यात यावीत. जेणेकरून जनतेला सुविधा मिळतील.- रमेश भाटकर, वकील
न्यायालयाचे शासनाला निर्देश : "मार्च 2024 पर्यंत आरोग्य विभागातील रिक्त पदांची भरती सरकारनं केल्यास राज्यातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यास मदत होईल. त्यामुळं शासनाने त्या दिशेनेच पाऊल टाकावीत. राज्य सरकारनं मार्चपर्यंत आरोग्य विभागातील रिक्त पदे भरावीत, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी मार्च 2024 मध्ये करण्यात येईल, असं देखील न्यायालयानं म्हटलंय.
हे वाचलंत का :