मुंबई Historical Banganga Lake : बृहन्मुंबई महानगरपालिका वाळकेश्वर येथील ऐतिहासिक बाणगंगा तलावाच्या स्वच्छतेसाठी आता नवीन तंत्रज्ञानाची चाचणी घेणार आहे. पुढील आठवड्यापासून या चाचणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. बाणगंगा तलावातील गाळ बाहेर काढण्यासाठी महापालिका प्रशासन या तलावात 'जेलीफिश' सोडण्याच्या प्रयत्नात आहे. जेलीफिश हे गाळ उपशासाठी वापरलं जाणारं अत्याधुनिक रोबोटिक उपकरण असून, पुढील आठवड्यात याची चाचणी केली जाणार आहे.
गाळ, कचरा काढण्यासाठी वापरणार जेलीफिश : महापालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, बाणगंगा तलाव हे जागतिक वारसा स्थळांपैकी एक ऐतिहासिक ठिकाण असल्यानं या तलावाच्या कामात विशेष काळजी घेतली जात आहे. तलावाच्या मूळ संरचनेला कोणतीही बाधा येऊ नये, यासाठी जेलीफिश मशीन वापरून चाचण्या घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे मशीन रिमोट-नियंत्रित असून, त्याची रेंज 1 किलोमीटर आहे. पाण्यातून कचरा, तेल आणि फुलं गोळा करण्यासाठी डिझाइन केलेल्या विविध जाळ्या वापरून हे मशीन काम करते.
सलग सात तास करते जेलीफिश काम : जेलीफिश मशीन सलग सात तासांपर्यंत काम करण्यास सक्षम असून, ऑटो मोडमध्ये देखील हे मशीन काम करते. या रोबोटिक उपकरणाची प्राथमिक चाचणी झाली असून, अद्याप अंतिम चाचणी बाकी आहे. या यंत्राच्या वापराचा निर्णय घेण्यापूर्वी अंतिम चाचणी घेतली जाईल, अशी माहिती महापालिकेनं दिली आहे. पितृ पक्षाच्या विधीनंतर स्वच्छतेसाठी ही चाचणी आवश्यक आहे. पितृ पक्ष हा 16 दिवसांचा कालावधी आहे या दरम्यान लोक बाणगंगा तलावामध्ये पिंड दान करून त्यांच्या पूर्वजांचं स्मरण करतात. यासह अन्य धार्मिक विधी देखील या तलावात केले जात असल्यानं तलावाचं पाणी प्रदूषित होऊन मासे मरतात. त्यामुळे आता खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेनं पितृ पक्षानंतर लगेचच या तलावाच्या स्वच्छ्तेचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा :