मुंबई Students Education Issue : मुंबई जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर मुंबई महापालिका शिक्षण अधिकाऱ्यांनी 10 फेब्रुवारी रोजी शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती. मात्र रविवारी 11 फेब्रुवारी रोजी १००० शाळेतील शिक्षक हजर राहिले नाहीत. त्यामुळे पुन्हा 12 फेब्रुवारी रोजी सर्व शिक्षकांनी हजर राहणं अनिवार्य आहे, असं म्हणत 11 फेब्रुवारी रोजी उशिरा मुंबई महापालिकेचे मुख्य शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी अंतिम नोटीस जारी केलेली आहे. परंतु शिक्षकांचा असहकार कायम आहे. वर्ग ओस पडल्यावर विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? असा शिक्षक मंडळींचा सवाल आहे.
नेमून दिलेल्या निवडणूक कार्यालयात हजर व्हा : महाराष्ट्रात लोकसभा पंचवार्षिक निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून मुंबई महापालिका शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ आणि राजू तडवी यांना आदेश प्राप्त झाले. त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी मुंबईतील खासगी, अनुदानित आणि सरकारी शाळातील 1000 शिक्षकांना 24 तासांच्या आत हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु 11 फेब्रुवारीला रविवारी रोजी शिक्षक तिथे हजर राहिले नाहीत. नेमून दिलेल्या निवडणूक कार्यालयात हजर न राहिल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याची अंतिम नोटीस मुख्य शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी जारी केलेली आहे.
वर्गातील विद्यार्थी राहणार रामभरोसे? महाराष्ट्र शिक्षण परिषदेचे नेते शिवनाथ दराडे म्हणाले की, "मुंबई महापालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, जिल्हाधिकाऱ्यांच्या निवडणुकीच्या कामकाजासाठीचा आदेश प्राप्त झाला. त्यामुळे शनिवारी बजावलेल्या नोटीसमध्ये त्यांनी 24 तासाच्या आत बीएलओ यांना कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र शिक्षण अधिकार कायद्यानुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नका, असं स्पष्टपणे म्हटलेलं असताना हे आदेश देणं म्हणजे मुलांचं शिक्षण अंधारात ढकलणं होय. सर्वे करायचा कोणी? प्रशिक्षण घ्यायला जायचं कोणी? परीक्षा तोंडावर आली असताना मुलांना शिकवायचं कोणी? यासाठी आधी मुंबईमधील 1000 शाळांकरिता शिक्षकांची व्यवस्था निवडणूक आयोगानं आणि शासनानं केली आहे काय? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. शिक्षण आणि विद्यार्थी यांच्यामध्ये दुरावा निर्माण करू नका. अन्यथा असहकार कायम असेल. शासनाने हा विषय 'रामभरोसे' ठेवलेला आहे", असं देखील सरतेशेवटी त्यांनी नमूद केलं आहे.
हेही वाचा:
- महाराष्ट्रात येताना शिवचरित्राचा अभ्यास करूनच बोला, अमोल मिटकरी यांचा योगी आदित्यनाथ यांना सल्ला
- भाजपाकडून अशोकराव चव्हाण यांची राज्यसभेवर लागणार का वर्णी? भाजपा इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली
- काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अशोकराव चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया, एक ते दोन दिवसात ठरविणार राजकीय दिशा