मुंबई Illegal Street Food Vendors : बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून अनधिकृत खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि बेकायदेशीर पार्किंगवर आजपासून धडक कारवाई होणार आहे. या मोहिमेअंतर्गत प्रामुख्यानं रस्त्यांवरील अनधिकृत चायनीज फूड स्टॉल्स आणि इतर अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल. या विशेष मोहिमेसाठी पालिकेच्या प्रत्येक प्रभागातदेखील स्थानिक पातळीवर पथकं तयार करण्यात आली आहेत. पालिकेची तीन विशेष पथकं आजपासून मुंबई शहर तसंच पूर्व आणि पश्चिम उपनगरात तपासणी मोहीम सुरू करणार असल्याचं पालिका प्रशासनानं म्हटलंय.
अनधिकृत हातगाड्यांमुळं रोगराई वाढण्याची शक्यता : अनधिकृत विक्रेत्यांमुळं पादचाऱ्यांना होणारा अडथळा, वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक आरोग्याच्या महत्त्वपूर्ण समस्यांसह अनेक समस्यांचं निराकरण करणं हे यामागचं उद्दिष्ट आहे. हे स्टॉल्स अनेकदा परिसरातील अस्वच्छता आणि घाणीला कारणीभूत ठरतात. त्यामुळं पावसाळ्यात या अनधिकृत हातगाड्यांमुळं रोगराई वाढण्याची शक्यता असते. यालाच आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं पालिकेनं म्हटलंय.
विशेष मोहिमेसाठी विशेष टीम : अनेकदा पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर धाडसत्रात पक्षपातीपणाचा आरोप होतो. काही अधिकाऱ्यांवर लाच घेतल्याचादेखील आरोप होतो. हे टाळण्यासाठी पालिकेनं या मोहिमेत विशेष काळजी घेतल्याचं आढळून येतंय. या विशेष मोहिमेसाठी पालिका प्रशासनानं शहर तसंच पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये स्पेशल टीम तयार केल्या आहेत. वाद टाळण्यासाठी या टीममधील अधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेर काम करणार आहेत. उदाहरणार्थ, मुंबई शहरातील अधिकारी हे पूर्व किंवा पश्चिम उपनगरात धाड मोहीम राबवतील. तर, पूर्व पश्चिम उपनगरातील अधिकारी हे इतर क्षेत्रात आपलं कर्तव्य बजावतील. पालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, संध्याकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत चायनीज गाड्यांवर विशेष गर्दी दिसून येते. त्यामुळं याच वेळेत तपासणी मोहीम अधिक तीव्रतेनं राबवण्यात येणार आहे.
पालिका उपायुक्तांची प्रतिक्रिया : या संदर्भात महानगरपालिकेचे उपायुक्त किरण दिघावकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितलं की, “रस्त्याच्या कडेला अन्न शिजवणे आणि विक्री करणे हे अनधिकृत आणि बेकायदेशीर आहे. मुंबई उच्च न्यायालयानंदेखील फेरीवाल्यांना खाद्यपदार्थ शिजवण्यास आणि विक्री करण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे, तरीही ते खुलेआम असं करताना दिसतात. हे गाडे रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला फेरीवाल्यांनी बनवलेलं खाद्यपदार्थ खाल्ल्यानं रोगराई पसरण्याचा धोका जास्त असतो. यालाच आळा घालण्यासाठी पालिकेनं ही मोहीम हाती घेतली आहे."
अनधिकृत स्टॉल्सवर केली जाणार कारवाई : विशेष पथकांच्या पाहणीदरम्यान अनधिकृत स्टॉलधारक आढळल्यास या स्टॉल्सवर सापडलेले साहित्य जप्त करण्यात येईल, असं पालिकेनं सांगितलंय. तसंच जप्त करण्यात आलेलं सामान एफ उत्तर विभाग, माटुंगा येथील नियुक्त गोदामात ठेवण्यात येणार आहे. विक्रेत्यांना जप्त केलेलं सामान परत मिळवायचं असल्यास त्यांना दंड भरावा लागेल. दरम्यान, 2021 पासून ते आतापर्यंत 11,811 हून अधिक अनधिकृत फूड स्टॉलवरून गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. हे सिलेंडर त्यांच्या संबंधित कंपन्यांना परत करण्यात आल्याची माहिती महापालिकेनं दिलीय.
हेही वाचा -
- देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेच्या मुदत ठेवींमध्ये घट, प्रशासन उधळपट्टी करत असल्याचा माजी नगरसेवकांचा आरोप - BMC Fixed Deposits
- मुंबईत प्रशासकीय शित युद्ध, रेल्वेने 572 कोटींचा कर थकवला, बीएमसीचा आरोप - Railways owes 572 crore tax
- नवी मुंबई महानगरपालिका, पोलिसांकडून रात्रभर डान्सबार, पबवर तोडक कारवाई - Action on pubs in Navi Mumbai