मुंबई Blind Govinda Pathak News : मुंबईसह राज्यात आज दहीहंडीचा उत्साही माहोल पाहायला मिळतोय. ठिक-ठिकाणी तरुण-तरुणींच्या गोविंदा पथकाकडून मानवी मनोरे रचले जाताय. तसंच हा रोमहर्षक थरार अनुभवण्यासाठी मुंबईत दहीहंडीप्रेमींची गर्दी उसळली आहे. या पार्श्वभूमीवर आयडियल बुक डेपो आयोजित दहीहंडी उत्सवात दृष्टीहीन तरुण-तरुणींचा समावेश असलेल्या नयन फाऊंडेशन गोविंदा पथकानं मानवी मनोरा रचत सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय. तसंच यावेळी दृष्टीहीन महिला गोविंदा पथकानं जो सामाजिक संदेश दिलाय त्याची सध्या दादरमध्ये चर्चा होत आहे.
राज्यात सध्या महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं चित्र आहे. या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असले तरी, सामान्य जनता मात्र जनजागृती करताना दिसत आहे. आज दहीहंडीच्या उत्सवानिमित्त याच विषयावर जनजागृती करण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळालं. नयन फाउंडेशन गोविंदा पथकानं महिला अत्याचारासंदर्भात सामाजिक संदेश दिला. "तुम्हाला जर आपल्या माता-भगिनींकडे चांगल्या नजरेनं पाहता येत नसेल तर तुम्ही तुमचे डोळे दान करा. तुमच्या डोळ्यांची इतरांना गरज आहे", असा संदेश या दृष्टीहीन गोविंदा पथकांनी आज दादर येथे दिलाय.
महिला अत्याचाराबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न : महिला गोविंदांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधत असताना सांगितलं की, "मागील दहा वर्षांपासून आम्ही संपूर्ण मुंबईत दहीहंडीला सलामी देण्यासाठी फिरतो. सकाळी सात वाजता आम्ही घरातून बाहेर पडतो. सर्वात प्रथम दादर आयडियल बुक डेपो येथे आम्ही दहीहंडीला सलामी देतो. त्यानंतर संपूर्ण मुंबईत आम्ही हंडीला सलामी देतो. रात्री अकरा ते बारा वाजता आम्ही घरी जातो. दरवर्षी आम्ही काही ना काही सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो. यावेळी आम्ही महिला अत्याचाराबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केलाय."
या महिलांच्या गोविंदा पथकात एकूण बारा मुली असून, त्या तीन थरांचा मानवी मनोरा रचतात. या महिलांची दहीहंडी पाहण्यासाठी दादरकर आवर्जून उपस्थिती लावतात. पुरुष आणि महिला असे एकत्र मिळून साधारण पन्नास दृष्टीहीन गोविंदा संपूर्ण मुंबईत नयन फाउंडेशनच्या माध्यमातून दहीहंडीला सलामी देतात.
हेही वाचा -
- "नट, नट्यांचे बीभत्स नृत्य दाखवण्यापेक्षा...", दहीहंडी समन्वय समितीनं व्यक्त केली नाराजी - Dahi Handi Dance
- साईनगरीत गोकुळाष्टमीची धूम, साईभक्तांनी दहीहंडी फोडत उत्सव केला साजरा - Shirdi Saibaba Dahi Handi
- ढाक्कू माक्कूम ढाक्कू माक्कूम! मुंबईत दहीहंडी फोडण्यास सुरुवात; महिला गोविंदांचाही मोठा सहभाग - Dahi Handi Festival 2024