मुंबई NCP Will Merge With Congress ? : लोकसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. राज्यात चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरींसोबतच दावे-प्रतिदावे देखील केले जात आहे. अशातच आगामी काळात छोटे प्रादेशिक पक्ष काँग्रेस पक्षात विलिन होतील असं, विधान शरद पवार यांनी केलं. त्यांच्या या विधानामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे. दुसरीकडं सत्ताधाऱ्यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
विलिनीकरणाचा प्रश्नच येतं नाही - महेश तपासे : "लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात इंडिया आघाडीची सत्ता येईल," असा विश्वास महेश तपासे यांनी व्यक्त केला. "एनडीए प्रणित भाजपा सरकारला नागरिक कंटाळले असून देशात इंडिया आघाडीच्या बाजूने जनतेने झुकतं माप दिलं. त्यामुळेच शरद पवारांनी सांगितलं आहे की, लोकांचा परत विश्वास नेहरू गांधी यांच्या विचारसरणीकडं जात आहे. त्यामुळे देशातील छोटे-मोठे सर्व पक्ष इंडिया आघाडी, काँग्रेस सोबत येतील. काही पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होऊ शकतील, अशी शक्यता शरद पवार यांनी व्यक्त केली. याला यापूर्वी शरद पवार यांनी ठामपणे नकार दिलाय. शरद पवार यांनी वेळोवेळी स्पष्ट केलं आहे की आमच्या पक्षाची विचारसरणी नेहरू गांधी यांच्या विचारसरणीशी मिळती जुळती आहे. म्हणून आम्ही इंडिया आघाडी सोबत आहे. विलनीकरणाचा कुठलाच प्रश्नच येत नाही, शरद पवार यांनी असे कुठलेही संकेत दिले नाहीत," असं महेश तपास यांनी स्पष्ट केलं आहे.
शरद पवार परिस्थितीनुसार रंग बदलतात- प्रवीण दरेकर : शरद पवारांच्या विधानानंतर भाजपाकडून देखील प्रतिक्रिया आली आहे. भाजपा आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, "महाराष्ट्र राज्यात तीन टप्प्यातील निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीचं काय होणार, याचं चित्र स्पष्ट झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विलिनीकरणाचा पत्ता शरद पवार यांच्याकडून फेकण्याचा प्रयत्न दिसत आहे. शरद पवार परिस्थितीनुसार रंग बदलतात. एका बाजुला हुकूमशाही बोलतात आणि दुसऱ्या बाजुला घराणेशाहीला समर्थन करतात. देशात प्रादेशिक पक्षाची अस्मिता भाजपानं जपली."
लोकसभा निवडणूक निकालानंतर सर्व स्पष्ट होईल - पृथ्वीराज चव्हाण : "शरद पवार यांनी आपले वैयक्तिक मत मांडलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील विचारात काही फरक नाही. काँग्रेस पक्षात आपला पक्ष विलीन करणार का, यावर शरद पवार म्हणाले होते की, सहकाऱ्यांना विचारून तो निर्णय होईल, असं ते म्हणाले."
पक्ष विलनीकरण हाच पर्याय - संजूभोर पाटील : "शरद पवार यांना त्यांच्या उरलेल्या पक्षाचं भवितव्य लक्षात आलं आहे. त्यामुळे हे पक्ष काँग्रेस पक्षात विलिनीकरण करण्याशिवाय पर्याय नाही. अस्तित्व संपुष्टात येणार असल्याची जाणीव झाल्यामुळे अशा प्रकारे शरद पवार यांनी वक्तव्य केलं. आगामी काळात देशात आणि राज्यात NDA मोठ्या प्रमाणात यश मिळवणार असल्यामुळे शरद पवार यांनी केलेलं भाकीत खरे आहे," असं शिवसेना पक्षाचे प्रवक्ता संजूभोर पाटील यांनी यावेळी सांगितलं.
शरद पवार यांना निकालाची धास्ती : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होऊ शकतात, यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सुरज चव्हाण म्हणाले की, "लोकसभा निवडणुकीच्या निकालाची धास्ती घेऊन शरद पवार यांनी कदाचित अशा प्रकारचं विधान केलं गेलं असावं. भविष्यात जो काय लोकसभेचा निकाल लागणार आहे, याची जाणीव शरद पवार यांना झाली असावी. शरद पवार राज्याच्या राजकारणातील असं नेतृत्व आहे की, हवामान खात्याला अंदाज येऊ शकत नाही, मात्र त्यांचे राजकारणातील अंदाज अचूक असतात. कदाचित अंदाज आल्यामुळे अशा प्रकारचे स्टेटमेंट दिलं असेल."
हेही वाचा :
- शरद पवारांनी फेकला नवा राजकीय बॉम्ब, उद्धव ठाकरेंची होणार का अडचण? - Sharad Pawar
- "शरद पवार आणि राजनाथ सिंह यांचं सेटलमेंट...", प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, राजकीय वाद पेटणार? - Prakash Ambedkar
- मडकं फोडतात विरोधक, मात्र फायदा होतो शरद पवारांनाच! विरोधकांनी मडकं फोडून जनतेत निर्माण केलाय असंतोष - Lok sabha election 2024