मुंबई : मतदानाचा दिवस आता हळूहळू जवळ येत आहे. अशातच राजकीय समीकरणं देखील बदलताना दिसत आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघात भाजपा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाठिंबा देणार की नाही? या चर्चा सुरू असतानाच भाजपानं मनसेला शिवडी विधानसभा मतदारसंघात पाठिंबा जाहीर केला. माहीमच्या चर्चा सुरू असताना भाजपानं शिवडी विधानसभेत मनसेला पाठिंबा दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. माहीम विधानसभेच्या जागेवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर शिवडी विधानसभा मतदारसंघातून मनसेचे बाळा नांदगावकर रिंगणात आहेत. यात भाजपा अमित ठाकरे यांना पाठिंबा देईल असं बोललं जात होतं. मात्र, भाजपानं शिवडी विधानसभेत बाळा नांदगावकर यांना पाठिंबा दिल्यानं चर्चेचा विषय बनला आहे.
राज ठाकरे यांचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा : लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपा मनसेला मदत करेल असं बोललं जात होतं. आपण माहीम विधानसभा विधानसभेचा विचार केला असता, इथं महायुतीचे सदा सरवणकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे महेश सावंत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, अमित ठाकरे देखील पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. महायुती सदा सरवणकर यांचा अर्ज मागे घेऊन अमित ठाकरे यांना पाठिंबा देईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. तर, दुसरीकडं विविध कार्यक्रमांमध्ये भाजपाच्या अनेक नेत्यांनी मनसेला पाठिंबा देणार असल्याची सूचक विधानं केली आहेत. पण प्रत्यक्षात मात्र माहीमच्या चर्चा सुरू असताना भाजपानं शिवडी विधानसभेत मनसेला पाठिंबा जाहीर केला आहे.
आशिष शेलार यांनी जाहीर केला पाठिंबा : मंगळवारी शिवडी विधानसभेत एका कार्यक्रमादरम्यान भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवडी विधानसभेत भाजपाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा जाहीर केला. सोबतच हा पाठिंबा केवळ शिवडी विधानसभा मतदार संघापुरताच मर्यादित असल्याचं आशिष शेलार यांनी आवर्जून स्पष्ट केलं. माहीम विधानसभा मतदारसंघात अमित ठाकरे यांना भाजपानं पाठिंबा द्यायला हवा, या चर्चांना खुद्द आशिष शेलार यांनीच सुरुवात केली. भाजपानं मनसेला पाठिंबा दिला खरा मात्र, ऐनवेळी मतदारसंघ बदलल्यानं विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा :