मुंबई BJP CORE COMMITTEE MEET: जनतेशी कुठल्याही पद्धतीचा संपर्क साधण्यापूर्वी कार्यकर्त्यांशी संवाद साधणं फार महत्त्वाचं असल्याची भूमिका महाराष्ट्राचे प्रभारी, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी मांडली. ते मुंबई येथे आयोजित भाजपाच्या कोअर कमिटी बैठकीत बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारण्यासाठी राज्यात भाजपाचे नेते सक्रिय झाले आहेत. त्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. या बैठकीत सर्व काही आलबेल असून महायुती विधानसभा निवडणूक एकत्रित लढणार असे भाजप नेत्यांकडून सांगण्यात आले आहे. परंतु हे इतकं सोपे नसेल. कारण या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून शिवसेना शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादीनं (अजित पवार गट) सहकार्य केलं नसल्याच्या अनेक नेत्यांनी तक्रारी केल्याची माहिती समोर आली आहे. यावरून येणाऱ्या दिवसात महायुतीत या मुद्द्यावर पुन्हा खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
विविध मुद्द्यांवर चर्चा: लोकसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या जिव्हारी लागला आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी भाजपानं आता 'मिशन विधानसभा' आखलं आहे. याच अनुषंगाने राज्याचे प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव त्याचबरोबर सहप्रभारी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत राज्यात होणाऱ्या बैठकांची संख्या वाढली आहे. गुरुवारी भाजपाच्या प्रदेश कार्यालयात सायंकाळी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला कोअर कमिटीच्या आठ सदस्यांबरोबर इतरही काही वरिष्ठ नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. येणाऱ्या विधानसभा निवडणुका या 'महायुती' म्हणूनच लढवल्या जातील, असं या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं. त्याचप्रमाणे कुठल्याही पद्धतीचा संपर्क जनतेशी साधण्याअगोदर कार्यकर्त्यांशी संवाद साधणे फार महत्त्वाचं असल्याची भूमिका प्रभारी, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी मांडली. यासोबत राज्यात मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाची भूमिका कशा पद्धतीची राहील, यावरही बैठकीत मंथन करण्यात आलं.
झालं गेलं विसरून जा: विधानसभा निवडणुका महायुती म्हणून एकत्रित लढल्या जातील, असं सांगितलं गेल्यानंतर अनेक नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे पक्ष त्याचबरोबर राष्ट्रवादी ( अजित पवार गट) सहकार्य केलं नसल्याच्या तक्रारी मांडल्या. विशेष म्हणजे भाजपा नेत्या तथा आमदार पंकजा मुंडे त्याचबरोबर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या बैठकीत लोकसभा निवडणुकीत त्यांच्या झालेल्या पराभवाबाबत काही मुद्दे उपस्थित केले. " जे काही घडलं, त्यावर पडदा टाका. झालं गेलं विसरून जा. आता नव्या जोमानं एकत्रित विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून सामोरे जा,"असा सल्ला प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांनी दिला.
भाजप १६० ते १७० जागा? जागा वाटपाच्या संदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजपाने १६० ते १७० जागा लढवाव्यात, अशी परिस्थिती राज्यात असल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं आहे. परंतु अद्याप अंतिम निर्णय हे तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय नेतृत्व ठरवेल. परंतु जागा वाटपा संदर्भात कुठल्याही नेत्यांनी बाहेर भाष्य माध्यमांशी करू नये, असा इशाराही या बैठकीत देण्यात आला आहे.
हेही वाचा