पुणे : एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक IX 613 नं तामिळनाडूमध्ये अखेर सुरक्षित लँडिंग केलंय. तिरुचिरापल्ली (त्रिची) येथून 141 प्रवाशांसह शारजाकडं उड्डाण करणारं एअर इंडिया एक्सप्रेसचं हे विमान यांत्रिक बिघाडामुळं सुमारे दीड ते दोन तास त्रिची परिसरात आकाशात प्रदक्षिणा घालत होतं. दरम्यान, या घटनेवर आता केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले मुरलीधर मोहोळ? : यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधतना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, "त्रिची विमानतळावरून शारजाहला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान हायड्रोलिक बिघाडामुळं परत त्रिची विमानतळावर उतरावे लागले. या विमानाचं इंधन वैमानिकांना कमी करायचं होतं. त्यामुळं विमानानं सुमारे 4000 फूट उंचीवर 2 तास हवेत उड्डाण केलं. त्यानंतर विमानाचं सुरक्षित उतरवण्यात आलं." तसंच पायलट, एटीसी आणि विमानतळ संचालक यांच्या समन्वयामुळं मोठी दुर्घटना टळली, असंही मोहोळ म्हणाले.
नेमकं काय घडलं? : शुक्रवारी (11 ऑक्टोबर) सायंकाळी एअर इंडियाच्या विमानानं त्रिची विमानतळावरून उड्डाण घेतलं होतं. परंतु, उड्डाण घेताच विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं पायलटच्या निर्देशनास आलं. त्यामुळं हे विमान जवळपास दोन तास आकाशात घिरट्या घालत होतं. अखेर काही वेळानं या विमानाला सुखरूप उतरवण्यात यश आलं. सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी या विमानात जवळपास 140 प्रवासी प्रवास करत होते. त्रिची विमानतळाच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानामधील हायड्रॉलिक सिस्टिममध्ये बिघाड झाल्याचं पायलटच्या लक्षात आलं. त्यामुळं या विमानाचं लॅंडिंग करण्यात आलं.
हेही वाचा -
- "एअर इंडियानं अन्याय केला...", रामदास आठवले नागरी उड्डाण मंत्र्यांकडं करणार तक्रार, नेमकं प्रकरण काय?
- विमानात प्रवास करताना तुटलेली सीट मिळाल्यानं भडकला दिग्गज क्रिकेटपटू; एअरलाइननं मागितली माफी - Jonty Rhodes LSG
- लखनऊला येणाऱ्या एयर इंडिया विमानाचं दुबई विमानतळावर इमर्जन्सी लँडींग - Emergency Landing In Dubai