ठाणे Bhiwandi News : हल्लीच्या तरुणाईमध्ये मोबाईलवरून खाद्यपदार्थांची ऑनलाईन ऑर्डर करण्याची क्रेझ वाढत असल्याचं बघायला मिळत असतानाच, झोमॅटो कंपनीनं विल्हेवाटसाठी दिलेलं कालबाह्य खाद्यपदार्थांची ऑर्डर स्वीकारून त्याची विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे त्या कालबाह्य खाद्यपदार्थाची स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री करून ग्राहकांची फसवणूक करीत असल्याचं पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहेत. मोहमद अहमद मोहरम अली कुरेशी (वय-42) व असीम अक्रम अन्सारी (वय-31) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
काय आहे प्रकरण? : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खाद्यपदार्थांची ऑनलाईन ऑर्डर घेणाऱ्या झोमॅटो कंपनीने 11 मार्च रोजी त्यांच्या पाव, बटर, मिठाई अशा विविध प्रकारच्या 57 हजार 300 रुपये किमतीचे कालबाह्य खाद्यपदार्थ विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी मोहमद आणि असीम या दोघांना दिले होते. मात्र, दोघांनीही आर्थिक फायद्यासाठी त्या खाद्यपदार्थाची विक्री करून ग्राहकांची फसवणूक केल्याचं आढळून आलं आहे. विशेष म्हणजे कालबाह्य पाव, बटर, मिठाई हे खाद्यपदार्थ भिवंडी शहरातील खंडू पाडा रोड परिसरातील एका गाळ्यात साठवून त्या ठिकाणावरून दोन्ही आरोपी ग्राहकांना विक्री करून त्यांच्या जीवाशी खेळत असल्याचं समोर आलंय. याप्रकरणी तैफिक शिवलकर (वय 29) पोलीस कर्मचारी यांच्या तक्रारीवरून 12 मार्च रोजी भादंवि कलम 420, 328, 273, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांना अटक : दाखल गुन्ह्याच्या आधारे शांतीनगर पोलीस पथकानं आरोपी मोहमद अहमद मोहरम अली कुरेशी आणि असीम अक्रम अन्सारी या दोघांना अटक केली आहे. तसंच कालबाह्य पाव, बटर, मिठाई हे खाद्यपदार्थ पंचनामा करून नष्ट करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. तर या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक सुरेश घुगे करीत आहेत.
हेही वाचा -