मुंबई : सध्या सणासुदीचे दिवस आहेत. त्यातच आज (3 नोव्हेंबर) भाऊबीज असल्यानं अनेक बंधुराज आपल्या बहिणीच्या घरी ओवाळणीसाठी जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र, या बंधूराजांच्या प्रवासात आज अडथळे येण्याची शक्यता आहे. हा अडथळा मुंबईकरांची जीवन वाहिनी म्हटल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनचा नाही. तर, ज्याला मुंबईच्या धमन्या असं म्हटलं जातं त्या बेस्ट बसच्या संपामुळं येण्याची शक्यता आहे. एकीकडं दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं पश्चिम, मध्य, हार्बर या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, बेस्ट कर्मचारी संघटनेनं आज संपाचा निर्णय घेतल्यानं प्रवासात अडथळे येण्याची शक्यता आहे.
संपाचं कारण काय? : दिवाळीत बोनस न मिळाल्यानं बेस्ट कर्मचाऱ्यांनी आजचा संप पुकारला आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी 29 हजार रुपयांचा बोनस जाहीर केला होता. मात्र, बेस्ट उपक्रमा अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनस न मिळाल्यानं बेस्ट कर्मचाऱ्यांनी आता संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी बेस्ट कर्मचाऱ्यांचा बोनस हा दिवाळीच्या अगोदरच होतो. मात्र, यावर्षी अद्यापही बोनस न मिळाल्यानं या कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे.
निवडणुकीच्या नियम आणि अटींमध्ये अडकला कर्मचाऱ्यांचा बोनस : प्रशासनाच्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांचा बोनस वेळेत व्हावा यासाठी बुधवारी बेस्ट उपक्रमामार्फत निधीची जुळवाजुळव करण्याचे काम सुरू होते. मात्र, बैठका आणि चर्चा यातून काही मार्ग निघालेला नाही. त्यामुळं बेस्ट कर्मचाऱ्यांनी आज रविवार पर्यंतचा अवधी प्रशासनाला दिला होता. मात्र, अद्यापही बोनस न झाल्यानं कर्मचारी संपावर ठाम आहेत. दुसरीकडं आचारसंहिता असल्यानं बोनस देण्यात अडथळे येत असल्याचं प्रशासनाचं म्हटलंय. त्यामुळं निवडणुकीच्या नियम आणि अटींमध्ये अडकलेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा बोनस आज दिवसभरात मिळतो का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
हेही वाचा -