दौंड (पुणे) Bank Officer Murder Case : दौंड येथील बॅंक वसुली अधिकाऱ्याच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालखी मार्गावरील वासुंदे गावाच्या हद्दीतील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर 1 मार्च रोजी रात्री 7.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रात्रीच्या सुमारास प्रविण मळेकर त्यांच्या दुचाकी वरून जात असताना अज्ञात व्यक्तीनं त्यांच्यावर धारदार हत्यारानं वार केले. बँक ऑफ महाराष्ट्रचे (शाखा बारामती) रिकव्हरीचे नोटीस वाटप करण्यासाठी ते घरून बारामती परिसरात गेले होते. तिकडून परतत असताना ही घटना घडली. घटनेबाबत प्रविण मळेकर यांचा मुलगा ऋषिकेश प्रविण मळेकर यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा गुन्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक गटकुळ यांनी दाखल केला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड करीत आहेत.
जखमीच्या शरीरावर गंभीर वार : याबाबत सविस्तर वृत्त असं की, प्रविण मळेकर हे बँक ऑफ महाराष्ट्राच्या बारामती शाखेत बँकेचे रिकव्हरीचे नोटीस वाटप करण्यासाठी त्यांच्या घरून बारामती परिसरात गेले होते. त्या रात्री फिर्यादी ऋषिकेश प्रविण मळेकर यांना एका व्यक्तीनं फोन करून कळविलं की, "प्रविण मळेकर यांना कोणीतरी चाकू मारला आहे. ते जखमी अवस्थेत रोडवर पडलेले आहेत. त्यांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलला रुग्णवाहिकेतून पाठवून देत आहोत. तुम्ही तेथे जाऊन थांबा असं सांगितलं." त्यानंतर फिर्यादी यांनी ही घटना कुठे घडली असं विचारलं असता फोनकर्त्यानं वासुंदे गावाच्या हद्दीत इंडियन ऑईल पेट्रोलपंपाच्या समोर बारामती-फलटण रोडवर घटना घडल्याचं सांगितलं. रात्री 09:05 वाजताच्या सुमारास विश्वराज हॉस्पिटल येथे फिर्यादी ऋषिकेश पोहचले. त्यानंतर रात्री 09:15 वाजताच्या सुमारास फिर्यादीचे वडील प्रविण मळेकर यांना अँम्बुलन्समधून हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं. तेव्हा त्यांच्या शरीरावर शस्त्राचे गंभीर वार झालेले आढळून आले.
अन् पोलीस टीम लागली कामाला : हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी जखमी प्रविण मळेकर यांना तपासलं. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे प्राण गेले होते. यानंतर त्यांचा मुलगा फिर्यादी ऋषिकेश मळेकर यांनी दौंड पोलीस ठाणे गाठून वडिलांच्या हत्येची फिर्याद दिली. फिर्यादी जबाबावरून दौंड पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू असून एक पीआय, तीन पीएसआय आणि 15 कर्मचारी अशी टीम त्यावर काम करत आहेत. या गुन्ह्याच्या तपासाबाबत चांगली माहिती मिळालेली आहे, अशी माहिती दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
हेही वाचा: