छत्रपती संभाजीनगर Farmers Protest For Compensation : आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अशी मान्यता असणाऱ्या जायकवाडी धरणामध्ये गाळ साचल्यानं त्याचा परिणाम परिसरातील शेतकऱ्यांना भोगावा लागतोय. बॅक वॉटर क्षेत्राचं पाणी गंगापूर तालुक्यातील शेकडो एकर शेतात जात असल्यानं शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिकांचं नुकसान होतंय. त्यामुळं नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी गंगापूर तालुक्यातील अमळनेर इथं जलसमाधी आंदोलन केलंय. मात्र, या आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याची प्रकृती खालावल्यानं चिंता वाढली आहे. सदर शेतकऱ्यावर गंगापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
शेतकऱ्याची प्रकृती झाली खराब : पिकांचं होणारं नुकसान पाहता परिसरातील शेतकऱ्यांनी वारंवार शासन दरबारी अर्ज तक्रारी, निवेदनं दिली. मात्र, कोणत्याही हालचाली होत नसल्यानं अखेर गळनिंब, भिवधानोरा, नेवासा, शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी अमळनेर येथे शुक्रवारी (13 सप्टेंबर) सकाळी 11 वाजेपासून ते सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत सामूहिक जलसमाधी आंदोलन केलं. दिवसभर गार पाण्यात जलसमाधी आंदोलन करत असताना शेतकरी पाण्यात गारठले होते. त्यातील शेतकरी आंदोलक इसाभाई पठाण यांची प्रकृती चिंताजनक झाली. अधिक काळ थंड पाण्यात राहिल्यानं त्यांना वात, शरीराला मुंग्या आल्या आणि चक्कर येऊन ते पाण्यात कोसळले. त्यांना ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी तत्काळ उपचारासाठी गंगापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. तेथे तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी भेट देऊन इसाभाई पठाण यांची चौकशी करत, मागण्या वरिष्ठ पातळीवर पाठवल्याचं सांगितलं.
न्यायालयानं देखील दिले होते आदेश : गोदावरी विकास खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना अनेकवेळा निवेदन देण्यात आले. त्यात उच्च न्यायालयानं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश, संबंधित मंत्री आणि विभागांनी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून त्यांच्या पिकांची नुकसान भरपाई देण्याबाबत वेळोवेळी आदेश दिल्याचं नमूद केलंय. मात्र, तरी कोणतीही कारवाई झाली नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. शासनानं आमच्या जमिनी संपादित कराव्यात आणि एकरी तीन लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी जलसमाधी आंदोलन करून केली होती. तर जायकवाडी प्रकल्पाशेजारील गंगापूर, पैठण तालुक्यांतील शेतकऱ्यांनी नुकतीच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं होतं. जायकवाडी प्रकल्पाचं पाणी आमच्या बागायती जमिनीत येऊ देऊ नका, पाणी पिकांत शिरल्यास आम्ही तेथेच जलसमाधी घेऊ, असा इशारा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिलाय. जवळपास सात तास हे आंदोलन करण्यात आले. एक शेतकरी गंभीर आजारी पडल्यानंतर जायकवाडी पाटबंधारे प्रशासनानं याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडं पाठवल्याचं पत्र देत आश्वासन पूर्ण करण्याची हमी दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आलं.
हेही वाचा -