नाशिक : लोकसभा निवडणूक 2024 दिंडोरी मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या नावशी साधर्म्य असलेले अपक्ष उमेदवार बाबू सदू भगरे यांची जोरदार चर्चा रंगली. बाबू भगरे यांनी तब्बल 1 लाख 3 हजार 632 मतं मिळवली. आणि या निवडणुकीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा 1 लाख 13 हजार 199 मतांनी पराभव झाला. आता हाच पॅटर्न नाशिकच्या विधानसभा निवडणुकीत काही दिग्गज उमेदवार वापरताना दिसत आहेत.
नाम साधर्म्य असलेल्या उमेदवारांनी वाढवली डोकेदुखी : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचं चित्र अर्ज माघारीनंतर स्पष्ट होणार आहे. मात्र असं असताना काही मतदारसंघात काही दिग्गज उमेदवाराकडून विरोधी तुल्यबळ उमेदवाराचं मताधिक्य कमी करण्यासाठी नाम साधर्म्य असलेल्या व्यक्तीला अपक्ष उमेदवारी करण्यासाठी मोठ्या प्रमाणत आर्थिक आमिष दिलं जात आहे, असा आरोप करण्यात येतो. नाशिक पूर्व मतदार संघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गणेश गीते यांच्यासमोर नाम साधर्म्य असलेल्या उमेदवारानं अपक्ष अर्ज दाखल केला आहे. दरम्यान विरोधकांना पराभव समोर दिसत असल्यामुळे आपलं नाम साधर्म्य असलेली व्यक्ती शोधून त्यास बळजबरीनं उमेदवारी अर्ज दाखल करण्यास भाग पाडलं गेलं, असा गंभीर आरोप गणेश गीते यांनी केला. त्या संदर्भात पुरावा म्हणून शरद पवार पक्षाचे उमेदवार गणेश गीते यांनी संबंधितांमध्ये झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिपही पत्रकारांसमोर सादर केली.
ऑडिओची फॉरेन्सिक तपासणी करा : या घटनेनंतर भाजपाचे उमेदवार राहुल ढिकले यांनी शरद पवार पक्षाचे उमेदवार गणेश गीते यांचा आरोप फेटाळून लावला आहे. "लोकशाहीमध्ये प्रत्येक उमेदवाराला उमेदवारी करण्याचा अधिकार असून निवडणुकीत लक्ष वेधण्यासाठी केलेला हा विरोधकांचा स्टंट आहे. मुळात मीच मागणी करतो की फेक ऑडिओची फॉरेन्सिक तपासणी करून सत्यता पडताळणी केली पाहिजे. तसेच पोलिसांनी देखील चौकशी करून कारवाई करावी," अशी मागणी ढिकले यांनी केली.
नांदगावमध्ये दोन सुहास कांदे : नांदगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीचे सुहास कांदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर नाम साधर्म्य असलेल्या दुसऱ्या एका सुहास कांदेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नाम साधर्म्य ठेऊन भुजबळांनी युतीचे उमेदवार सुहास कांदे यांना अडचणीत आणण्यासाठी ही राजकीय खेळी केल्याचा आरोप विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सुहास कांदे यांना नांदगाव तहसील कार्यालयातून बाहेर जाण्यासाठी मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करत अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांनी त्यांना स्वतःच्या वाहनातून पोलीस बंदोबस्तात बाहेर नेले.
हेही वाचा :