मुंबई : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिसांनी शुक्रवारी पाच आरोपींना अटक केली आहे. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी मोठी धक्कादायक माहिती दिली आहे. मारेकऱ्यांच्या फोनमध्ये आमदार झिशान सिद्दीकी यांचा फोटो आढळला आहे. सोशल माध्यमातून या आरोपींनी झिशान सिद्दीकी यांच्याबाबतची माहिती मारेकऱ्यांपर्यंत पोहोचवली जात असे, अशी माहिती पोलीस तपासातून उघड झाली आहे. मुंबई पोलिसांनी याबाबतचा पुढील तपास सुरू केल्याची माहिती वृत्तसंस्थेला दिली आहे.
मारेकऱ्यांच्या फोनमध्ये आढळला झिशान सिद्दीकींचा फोटो : आरोपींची चौकशी करताना पोलिसांनी आरोपींच्या मोबाईलमध्ये बाबा सिद्धीकी यांचा सुपुत्र आमदार झिशान सिद्धीकी यांचा फोटो आढळला आहे. हा फोटो सोशल माध्यमांद्वारे एकमेकांना पाठवल्याचे तपासा दरम्यान समोर आले आहे. त्यामुळे आमदार झिशान सिद्दिकी सुद्धा लक्ष होते का.? तसेच आरोपींचा नेमका काय प्लॅन होता याबाबत आता कसून चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलीस शिपाई निलंबित : मुंबई पोलिसांनी शुक्रवारी पाच आरोपींना अटक केल्यानंतर या खून प्रकरणाला गती मिळाली आहे. मुंबई पोलिसांना मारेकऱ्यांच्या फोनमध्ये बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आमदार झिशान सिद्दीकी यांचा फोटो मिळाला. त्यामुळे पोलीस सतर्क झाले आहेत. पोलिसांनी बाबा सिद्दीकी यांची सुरक्षा करणाऱ्या पोलीस शिपायाला निलंबित केलं आहे. श्याम सोनवणे असं या निलंबित करण्यात आलेल्या पोलीस शिपायाचं नाव आहे. श्याम सोनवणे यांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली तेव्हा हा पोलीस शिपाई त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात होता.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आतापर्यंत 9 आरोपी अटकेत : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची 12 ऑक्टोबरला हत्या करण्यात आली होती. या हत्येमधील 9 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीची कसून चौकशी सुरू असून यामागे कोणती कारणे होती, याचा शोध घेतला जात आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगचा या खूनात सहभाग असल्याचे बोलले जात आहे. त्याबाबत अधिक तपास केला जात आहे. तपासा दरम्यान पोलिसांना काही धक्कादायक माहिती उघड होत आहे.
हेही वाचा :