मीरा भाईंदर : नालासोपारा मधील आचोळे पोलीस ठाण्यात मोबाईल टॉवरमधून रेडिओ फ्रिक्वेन्सीसाठी लावण्यात येणारे मशीन (आझना कार्ड) चोरी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात मोठं रॅकेट असल्याचा संशय असल्यानं तपास गुन्हे शाखा तीनकडं वर्ग करण्यात आला. गुन्हे शाखा तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी शिताफीनं तपास करून आंतरराष्ट्रीय बाजारात मशीन (आझना कार्ड) चोरी करुन विक्री करणाऱ्या सात जणांच्या आंतरराष्ट्रीय टोळीला अटक करण्यात यश आलंय.
लाखोंचा मुद्देमाल ताब्यात : या टोळीकडून एकूण छत्तीस मशीन हस्तगत करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात एकूण वीस गुन्ह्याची उकलदेखील झाली आहे. यामध्ये अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न गुन्हे शाखा करत असल्याची माहिती मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सात जणांच्या टोळीला अटक : गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकानं घटनास्थळाचे तांत्रिक विश्लेषण करून तसेच मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी शुभम यादव (24), शैलेश यादव (25), कपुरचंद्र गुप्ता (25), बंन्सीलाल जैन (50), जाकीर मल्लिक (25), जैद मलिक (19) आणि मोहम्मद जुनैद मलिक (24) यांना ताब्यात घेतले आहे. काही आरोपींना दिल्ली, बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेतलं आहे. या आरोपीकडून आतापर्यंत 40 लाख रुपये किंमतीचे 36 मशीन कार्ड, मोबाईल फोन, गुन्हा करताना वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल जप्त केलाय.
आरोपींना पोलीस कोठडी : चोरी केलेलं मशीन आझना कार्डची हाँगकाँग आणि चीन येथे बेकायदेशीररित्या विक्री करत असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून बिहार, झारखंड, पश्चिम बगाल, पंजाब, गोवा या राज्यातून चोरी केलेले आझना कार्ड हस्तगत केले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी मागील एक वर्षापासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार, नालासोपारा परिसरात मोठ्या प्रमाणात आझना कार्डची चोरी केल्याचं तपासात निष्पन्न झालंय. आरोपींना न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा -