अमरावती ZP School Students Melghat : अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जायचं तर त्यांच्याकरिता फुलांचा गुलदस्ता घेऊन जाण्याची प्रथा काही मंडळी हमखास जोपासतात. अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा (Sanjita Mohapatra) यांनी मात्र कृतीतून वेगळा आदर्श घडवून दिला. "मला भेटायला येताना फुलांचा गुलदस्ता आणण्याऐवजी जिल्हा परिषद शाळेतील गरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य आणा" अशा विनंतीचं पत्रकच आपल्या दालनाबाहेर त्यांनी लावलं आहे. या आगळ्यावेगळ्या आणि स्तुत्य उपक्रमासंदर्भात 'ईटीव्ही भारत'शी बोलताना संजीता मोहपात्रा यांनी, जिल्हा परिषदेच्या शाळेती गरीब तसेच आदिवासी विद्यार्थ्यांप्रती तळमळ व्यक्त केली.
अधिकाऱ्यांच्या दालनात पुष्पगुच्छंचा खच : अमरावतीत कुठल्याही विभागात नवे अधिकारी रुजू झाले की, काही विशिष्ट व्यक्ती, विशिष्ट संघटना, विशिष्ट मंडळाचे प्रतिनिधी त्यांच्या स्वागत, सत्कारासाठी फुलांचा गुच्छ घेऊन जातात. विशेष म्हणजे, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त या अधिकाऱयांचा स्वागत सोहळा हा तर ते रुजू झाल्यापासून सलग दोन ते तीन महिने सुरू असतो. यामुळं सुरुवातीचे दोन-चार महिने तर या अधिकाऱ्यांच्या दालनात पुष्पगुच्छांचा खच साचतो. काही खास मंडळी जेव्हा केव्हा अशा अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जातात त्यावेळी हमखास पुष्पगुच्छ नेतात. अशाच स्वरूपाचा अनुभव संजीता मोहपात्रा यांना सुरुवातीच्या काळात आला. आता देखील अनेकजण कामानिमित्त भेटण्यासाठी येतात आणि सर्वात आधी मोठा पुष्पगुच्छ देतात. या पुष्पगुच्छाचं आयुष्य हे दोन ते तीन दिवस असतं. असे पुष्पगुच्छ देण्याऐवजी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एखादी वही किंवा पेन जरी आणलं तर ते अतिशय चांगलं ठरेल, असं संजीता मोहपात्रा यांनी म्हटलं.
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीची अपेक्षा : अमरावती जिल्ह्यातील एकूण 14 तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या 1 हजार 668 शाळांमध्ये दोन लाखाच्या आसपास विद्यार्थी आहेत. यापैकी चिखलदरा आणि धारणी या मेळघाटातील दोन तालुक्यांमध्ये सातपुडा पर्वत रांगेत अतिशय दुर्गम भागात असणाऱ्या शाळेत अनेक आदिवासी चिमुकले शिकतात. मेळघाटातील या विद्यार्थ्यांना शासनाकडून एकदा गणवेश आणि पुस्तक मिळत असलं तरी त्यांच्या गावात वही, पेन, पेन्सिल काहीही मिळत नाही. यामुळं एकदाच भेटलेली वही पूर्ण भरल्यावर त्यांना दुसरी वही मिळत नाही. अनेक गावात साधा पेन किंवा पेन्सिल देखील उपलब्ध नाही. अशा दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना समाजाकडूनच मदतीची अपेक्षा आहे.
जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीनं हवी ती सर्व मदत केली जाते. असं असलं तरी प्रत्येक वेळी काही ना काही त्रुटी राहतातच. त्यामुळं मला भेटायला येताना फुलांचा गुलदस्ता आणण्याऐवजी जिल्हा परिषद शाळेतील गरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य आणा. - संजीता मोहपात्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी, अमरावती
समाजाला मदतीची संधी : "जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीनं मदत केली जाते. मात्र, काही त्रुटी राहतात. या त्रुटी पूर्ण करण्यासाठी समाजातील सर्वच घटकांची गरज आहे. यामुळं समाजातील व्यक्तींनी या विद्यार्थ्यांच्या मदतीकरिता योगदान देण्याची गरज आहे. आज आमच्या प्रेमापोटी एखादं फुल किंवा पुष्पगुच्छ आणण्याऐवजी या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या गरजेच्या वस्तू आणल्या तर समाजातील गरीब, आदिवासी विद्यार्थ्यांना मदतीची संधी उपलब्ध करून देणं हा मुख्य उद्देश आहे," असं संजीता मोहपात्रा म्हणाल्या.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटसारख्या दुर्गम भागात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत मिळावी यासाठी माझ्या प्रयत्नांची माहिती मी शिकत असलेल्या वस्तीगृहातील मित्रांना कळली. त्यावेळी त्यांनी या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला. आमच्या वस्तीगृहातील मित्रांच्या ग्रुपने एक बँक खातं उघडलं आणि त्यामध्ये मदत निधी जमा होतो. या मदत निधीद्वारे वेगवेगळ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मदत करण्याचं नियोजन आहे. समाजाचा चांगला प्रतिसाद मिळाला तर हा उपक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्याचा मानस आहे. - संजीता मोहपात्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी, अमरावती
अनेक संस्थांचा पुढाकार : मेळघाटातील दुर्गम भागात वसलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मदतीसाठी अनेक सामाजिक संस्था गत काही वर्षांपासून पुढाकार घेत आहेत. धामणगाव गढी येथील जाणीव संस्था, अमरावती येथील शिवसैनिक प्रदीप बाजड यांची आधार संस्था, अकोला येथील सेवा बहुउद्देशीय संस्था, स्वराज्य सेवा प्रतिष्ठान या काही सेवाभावी संस्थांमार्फत काही शाळा दत्तक घेतल्या आहेत.
संस्थांनी समन्वय साधावा : विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्याची गरज पूर्ण करणे यासह त्यांच्या क्रीडा गुणांना उजाळा देणे. तसेच त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचा उपक्रम देखील सेवाभावी संस्था घेतात. मेळघाटात विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेणाऱ्या अशा संस्थांनी आमच्याशी समन्वय साधावा. अशा अनेक संस्थांची मदत मेळघाटातील अतिदुर्गम भागात शिकणाऱ्या चिमुकल्यांना हवी आहे. कुणी साधी एक वही, एखादा पेन जरी दिला तरी ते आमच्यासाठी अतिशय मौल्यवान असल्याची भावना देखील संजीता मोहपात्रा यांनी व्यक्त केली.
हेही वाचा -
- सावळापुरात 1861 साली सापडली 'सत्यनारायणाची मूर्ती'; दर्शनासाठी आले होते अक्कलकोटचे 'स्वामी समर्थ', जाणून घ्या मूर्तीचं रहस्य - Satyanarayan Temple
- वर्षाला 21 टन माती चालली वाहून; मातीचा एक इंच थर तयार व्हायला लागतात 100 वर्षे - Soil Erosion Problem Amravati
- छत नसलेलं 'आनंदेश्वर' मंदिर आहे आश्चर्याचा खजिना, श्रावण सोमवारी मंदिरात भाविकांची गर्दी - Anandeshwar Mahadev Temple