पुणे Avinash Dharmadhikari : पूजा खेडकर यांना यूपीएससीने आणखी एक दणका दिला आहे. त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. तसंच त्यांना यापुढे कोणत्याही सरकारी परीक्षेला बसण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. आता या प्रकरणावर माजी निवृत्त अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत यूपीएससीने जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाने त्यांनी त्यांची विश्वासार्हता वाढवली आहे. त्यांच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या त्यांनी पूर्ण केल्या आहेत, असं यावेळी धर्माधिकारी यांनी म्हटलं आहे.
'हा' भ्रम दूर सारावा : अविनाश धर्माधिकारी पुढे म्हणाले की, या प्रकरणाचं युपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी सरसकटीकरण करू नये. युपीएससी आणि एमपीएससी मधून निवड होणारी बहुतांश मुले ही अशीच असतात, हे समजणं योग्य नाही. निवड होणारे विद्यार्थी हे खूप अभ्यास करून पुढे जात असतात. तसंच मुलांनी त्यांच्या मेहनतीवरील विश्वास कमी करू नये. अभ्यासाबरोबरच मुलांनी चरित्र देखील सुधारावं.
तरतुदींच्या गैरफायदा घेऊ नये : आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर झालेल्या कारवाई बाबत धर्माधिकारी म्हणाले की, यूपीएससीने पूजाच्या सर्व कागदपत्रांची छाननी करून जाहीर केलं की, तिने तरतुदींचा गैरफायदा घेतला. त्यामुळे तिची मूळची जी निवड तात्पुरती होती ती निवड रद्द केली. पुढे या प्रकारच्या कुठल्याही परीक्षांना बसायला तिला बंदी घातली आहे. हे प्रकरण म्हणजे, सगळ्यांनाच एक धडा आहे. अशा काही तरतुदींचा कोणी गैरवापर करून घेत नाहीये ना याकडं डोळ्यात तेल घालून अधिक लक्ष द्यावं लागणार आहे. मी वाचलं की, यूपीएससीने निवेदनात म्हटलं की त्यांनी 2009 ते 2023 या काळाची त्यांनी अशी 15 हजार प्रकरणे तपासली आहेत. यात एक तरतूद तपासली गेली आहे की, अशी जी सामाजिक वर्गवारी असेल तसेच विविध प्रमाणपत्राबाबत कोणी गैरफायदा तर घेत नाही ना, याची देखील पुढील काळात दक्षता घेतली पाहिजे असं यावेळी धर्माधिकारी यांनी सांगितलं.
असं घडू नये यासाठी पावलं उचवावी : अविनाश धर्माधिकारी पुढे म्हणाले की, यूपीएससीच्या धोरणाचं सावध स्वागत असं म्हणेल. यूपीएससी सारख्या व्यवस्थेकडून जी अपेक्षा आहे ती याबाबतीत पूर्ण झाली; पण या निमित्तानं माझी यूपीएससीलासुद्धा विनंती राहील की, केवळ एका प्रकारावर न थांबता यूपीएससीने कायद्याच्या भाषेत ज्याला सुमोटो म्हणतात, ज्यात आपणहून असं काही वावगं घडत नाहीत ना आणि यापुढेही घडणार नाहीत ना यासाठी पावलं उचलावी, अशी माझीसुद्धा यूपीएससीकडे विनंती आहे.
तर प्रशासनातली आव्हानं कशी पेलणार : अविनाश धर्माधिकारी विद्यार्थ्यांना आवाहन करत म्हणाले की, एका प्रकारामुळे या परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी हे जर विचलित व्हायला लागले तर उद्या प्रशासनातली आव्हानं ते कशी काय पेलणार आहेत? प्रशासनातली रोजची आव्हानं या घडलेल्या प्रकारापुढे काहीच नाहीत. अधिकाऱ्याचं उलट काम आहे की, चित्त शांत ठेवून लोकांच्या अडचणीत मदतीला धावून जायला हवं. एका पूजा खेडकर प्रकरणामुळे समजा मुलं विचलित व्हायला लागली तर माझं त्यांना म्हणणं आहे की, विचलित होऊ नका. स्वतःची जोपासना चालू ठेवा. परीक्षेत यशस्वी झाला तर पुढे तुम्हाला आणखी मोठी आव्हानं देशाकरिता लोकांकरिता पेलायची आहेत.
हेही वाचा:
- बनावट प्रमाणपत्र प्रकरणात पूजा खेडकर यांची अटकपूर्व जामीनसाठी न्यायालयात धाव, काय झाला निर्णय? - IAS Pooja Khedkar updates
- UPSC ने पूजा खेडकर यांच्यावर भविष्यातील सर्व परीक्षा देण्यावर घातली कायमची बंदी - Puja Khedkar debared
- पूजा खेडकर प्रकरणात आतापर्यंत काय घडलं? आयएएस पदावरून काढण्याकरिता 'हे' आहेत नियम - IAS POOJA KHEDKAR CASE