छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : जिल्ह्यातील नऊ मतदारसंघात मतमोजणी करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रत्येक केंद्रात 14 टेबलवर मतमोजणी होणार आहे. कोणत्याही उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधीला शंभर मीटरच्या आत मोबाईल घेऊन जाण्यास मनाई आहे तर निकाल जाहीर झाल्यावर कोणत्याही विजयी उमेदवाराला रॅली काढण्यास परवानगी असणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे. शहर आणि ग्रामीण भागात पोलीस यंत्रणा सज्ज असून कुठल्याही ठिकाणी दोन गटात वाद होणार नाही, याबाबत काळजी घेतली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
नऊ मतदार संघात यंत्रणा सज्ज : शुक्रवारी (22 नोव्हेंबर) दिवसभर जिल्ह्यातील नऊ मतदार संघातील यंत्रणेचा आढावा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला. प्रत्येक मतदान केंद्रातील टेबलांवरील मतमोजणी करण्यासाठी सूक्ष्म निरीक्षक देखील असणार आहेत. तसंच 5778 अधिकारी कर्मचारी सज्ज करण्यात आले. शहर आणि ग्रामीण भागात जवळपास 7 हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सुरुवातीला पोस्टल मतदानाची मोजणी होईल. त्यानंतर मशीनवरील मतं मोजण्यास सुरुवात केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये 32 लाख 2 हजार 751 हजार मतदारांपैकी 22 लाख 30 हजार 334 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. जिल्ह्यात एकूण 69.64 टक्के मतदानाची नोंद झाली. काही किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाल्यानंतर प्रशासन मतमोजणीला सज्ज झालं आहे. 20 मिनीटांत एक फेरी या प्रमाणे काही ठिकाणी 29 ते तर काही ठिकाणी 24 फेऱ्या होणार आहेत. वैजापूर येथे सर्वात कमी उमेदवार असल्यानं तेथील निकाल सर्वात लवकर लागण्याची शक्यता आहे.
मतमोजणीच्या विधानसभा मतदार संघ निहाय फेऱ्या :
- सिल्लोड- 29
- कन्नड- 27
- फुलंब्री- 27
- औरंगाबाद मध्य- 23
- औरंगाबाद पश्चिम - 28
- औरंगाबाद पूर्व- 24
- पैठण- 26
- गंगापूर- 27
- वैजापूर- 26
मतमोजणी केंद्रात असतील नियम : मतमोजणी शांततेत व्हावी, यासाठी मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलं आहे. त्या अन्वये मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात प्राधिकृत व्यक्तीव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश करण्यास, मोबाईल नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. हे आदेश मतमोजणी अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी यांना लागू राहणार नाहीत, असं स्पष्ट करण्यात आलंय. मतमोजणी कालावधीत आणि मतमोजणी नंतरही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पुरेसा पोलीस बंदोबस्त, केंद्रीय सुरक्षाबलांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. संवेदनशील भागात गस्त, ड्रोनद्वारे, सीसीटीव्हीद्वारे गस्त वाढवण्यात आली आहे. सद्यस्थितीत 6 केंद्रीय बल गट तर 2 राज्य राखीव पोलीस बल गट जिल्ह्यात तैनात आहेत, अशी माहिती पोलीस विभागानं दिली आहे.
हेही वाचा -