पुणे Attack On Nikhil Wagale Car : काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपा आक्रमक झाली आहे. आज पुण्यात राष्ट्रसेवा दल येथे निखिल वागळे यांच्या कार्यक्रमाला जोरदार विरोध करण्यात आला. यानंतर ते कार्यक्रमाच्या ठिकाणी येत असताना त्यांची गाडी फोडण्यात आली. (Nikhil Wagle meeting) पहिल्यांदा खंडूजी बाबा चौक तर पुन्हा शास्त्री रोड आणि दांडेकर पूल चौकात गाडीवर दगडफेक करण्यात आली. तसंच त्यांच्या गाडीवर शाईफेक देखील करण्यात आली आहे.
वागळेंच्या कार्यक्रमाला भाजपाचा प्रखर विरोध : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यामुळे आम्ही त्यांचा कार्यक्रम होऊ देणार नसल्याची भूमिका भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी घेत राष्ट्रसेवा दला समोर आंदोलन केलं होतं. कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता; पण कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच कार्यक्रमाच्या बाहेरील बाजूस येऊन भाजपा कडून ठिय्या आंदोलन करण्यात आलं. तर कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून देखील घोषणा देण्यात आल्या.
पोलीस बंदोबस्तातही गाडी फोडली : कार्यक्रमाच्या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं; परंतु नंतर पोलिसांनी चातुर्य दाखवत भाजपा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. कडक पोलीस बंदोबस्त असतानाही निखिल वागळे जेव्हा कार्यक्रमाच्या ठिकाणी येत होते तेव्हा ठिकठिकाणी त्यांच्या गाडीवर हल्ले करत गाडी फोडण्यात आली.
कोण आहेत निखिल वागळे : महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचे पत्रकार म्हणून निखिल वागळे यांची ओळख आहे. त्यांनी विविध वृत्तवाहिन्यांमध्ये संपादक पदावर काम केले आहे. राज्यातील पुरोगामी चळवळींना त्यांचा सदैव पाठिंबा राहिला आहे. शासनातील अनेक गंभीर प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आहे.
हेही वाचा: