पुणे Ashadhi Wari 2024: दोन दिवसांपूर्वी देहूवरुन जगद्गुरु संत तुकाराम महाराज तर काल आळंदीहून जगद्गुरु संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचं प्रस्थान झालं असून आज दोन्ही पालख्या संध्याकाळपर्यंत पुणे शहरामध्ये दाखल होणार आहेत. उद्या पुणे शहरात मुक्काम असणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतुकीत महत्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत. तसेच वाहतूक विभागाकडून काही महत्त्वाच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. शहरात ठिकठिकाणी वारकऱ्यांच्या स्वागताची तयारी देखील करण्यात आली आहे.
टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर: तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका अशा भक्तिमय वातावरणात आज जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि जगद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं पुण्यात आगमन होणार आहे. यंदा मोठ्या संख्येनं वारकरी उपस्थित आहेत. यंदाचा हा 339 वा पालखी सोहळा असून पुण्यात ठिकठिकाणी वारकरी दाखल झाले आहेत. त्यांचं स्वागत देखील मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. नाना पेठ येथील श्री निवडुंगा विठोबा देवस्थान ट्रस्ट येथील मंदिरात जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी असणार आहे. तर भवानी पेठ येथील पालखी विठोबा मंदिर इथं जगद्गुरु संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मुक्कामी असणार आहे.
वारकऱ्यांसाठी पुण्यात खास व्यवस्था : पुणे शहरात पालखी मुक्कामी असताना मोठ्या प्रमाणावर वारकरी हे येत आहेत. या अनुषंगानं वारकऱ्यांच्यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. ठिकठिकाणी वारकऱ्यांना थांबण्याची व्यवस्था तसेच त्याच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच पावसाच्या अनुषंगानं देखील सभा मंडप तसंच वैद्यकीय व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात वारकरी मुक्कामी असतात, त्या त्या ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली. तसंच अनेक ठिकाणी ई टॉयलेट देखील ठेवण्यात आले आहेत. वारकऱ्यांना कोणतीही अडचण होऊ नये, याची देखील खबरदारी घेण्यात आली आहे.
हेही वाचा