सिंधुदुर्ग Anganewadi Yatra : कोकणाची काशी म्हणून समजल्या जाणाऱ्या देवी भराडी आंगणेवाडी यात्रेला आज पहाटे सुरुवात झाली. नवसाला पावणाऱ्या आई भराडी देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. देवीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच रांगा लावल्या जात आहेत. त्यात आंगणेवाडी कुटुंबातील माहेरवाशिणी सुद्धा दाखल झाल्यात. दुपारच्या सत्रात आईच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होणार आहे. आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भराडी देवीचं दर्शन घेतलंय. यावेळी त्यांच्यासोबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे उपस्थित होते.
राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भराडी देवीचं दर्शन घेतल्यानंतर म्हटलंय की, "कोकणवासीयांचं श्रध्दास्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील आई भराडीदेवीचं आज दर्शन घेतलं. यावेळी राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव तसंच राज्यातील बळीराजावर ओढवलेलं अवकाळी पावसाचं संकट दूर कर, एवढंच मागणं आईच्या चरणी मागितलं. कोकणी माणूस हा जगात कुठंही असला तरीही दरवर्षी न चुकता अंगणेवाडीच्या जत्रेला आवर्जून उपस्थित असतो. आज माझं सौभाग्य की मला आई भरडीदेवीचं दर्शन घेण्याचं भाग्य मिळालं."
कोकण विकास प्राधिकरणाची स्थापना : पुढं बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकणासाठी मोठ्या घोषणा करत म्हणाले, "कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून त्यासाठी एमएमआरडीएच्या धर्तीवर 'कोकण विकास प्राधिकरण' स्थापन केलं असून या माध्यमातून या भागातील अनेक प्रकल्प मार्गी लावता येतील. तसंच कोकणातील नद्यातून वाहून जाणारं पाणी बंधारे बांधून अडवण्याची गरज आहे. शक्य तिथं असे बंधारे बांधून जास्तीत जास्त पाणी अडवण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. मुंबई-गोवा महामार्गाचं काम पूर्ण करण्यासोबतच मुंबई-सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल रस्ता तयार करण्यात येणार आहे."
हेही वाचा :
- 'नमो रोजगार मेळाव्या'निमित्त काका-पुतण्यांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकाच मंचावर, बारामतीत राजकारण तापणार
- सुप्रिया सुळेंनी स्वत: जाहीर केली बारामतीतून उमेदवारी? 'त्या' व्हॉट्सअॅप स्टेटसची जोरदार चर्चा
- 'तीन दिवसात माफी मागा'; नितीन गडकरींची मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश यांना कायदेशीर नोटीस, काय आहे प्रकरण?