अमरावती Amravati Murder News : प्रियकरासोबत असणाऱ्या अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं गळफास देत खून केलाय. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात येणाऱ्या विश्रोळी या गावात आज पहाटे ही धक्कादायक घटना समोर आली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
काय आहे सर्व प्रकरण : अमरावती जिल्ह्यातील विश्रोळी या गावात रवींद्र पारंजी इंगळे (53) हा पत्नी आणि मुलगी अनुष्का यांच्यासह राहत होता. त्याची पत्नीचे लगतच्या धामणगाव थडी या गावातील 31 वर्षीय अतुल शंकर लहाने याच्यासोबत अनैतिक संबंध होते. शंकरसोबत असणाऱ्या संबंधावरुन रवींद्र आणि त्याच्या पत्नीमध्ये नेहमीच वाद होत असत. गुरुवारी रात्री पत्नीनं अतुलला घरी बोलावून पती रवींद्र इंगळे याला मारहाण केली. यावेळी पत्नीनं तिच्या साडीच्या पदरानं आपला पती रवींद्रचा गळा आवळून त्याचा खून केला. यानंतर अतुल लहाने आपल्या धामणगाव थडी येथील आपल्या घरी निघून गेला. तसंच पत्नीचं माहेर गावातच असल्यामुळं ती भावाकडं निघून गेली.
सकाळी चिमुकलीनं फोडला टाहो : आज सकाळी मृत रवींद्र इंगळेच्या 14 वर्षाच्या मुलीनं घरात आई नसल्याचं पाहिले. तसंच झोपलेले वडील उठत नसल्यामुळं टाहो फोडला. रात्री वडिलांसोबत आई आणि अतुल लहाने यानं भांडण केल्याचं तिनं गावातच राहणाऱ्या मृतक रवींद्र यांचे भाऊ सिद्धार्थ इंगळे यांना सांगितलं. यानंतर सिद्धार्थ इंगळे यांनी रवींद्रच्या घराकडे धाव घेऊन आपला भाऊ खरच दगावला याची खातरजमा केली. यानंतर ब्राह्मणवाडा थडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या गंभीर घटनेची त्वरित दखल घेतली. पत्नी आणि तिचा प्रियकर अतुल लहाने या दोघांनाही अटक केलीय. या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास केला जात असल्याची माहिती ब्राह्मणवाडा थडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उल्हास राठोड यांनी दिलीय.
हेही वाचा :