पुणे Amitesh Kumar : पुण्यात हेल्मेट सक्तीला गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला विरोध पाहायला मिळत आहे. आजपर्यंत हेल्मेट सक्तीबाबत सर्वाधिक दंड पुणेकर नागरिकांना झाला असला तरी पुण्यात हेल्मेट सक्तीला विरोध होताना पाहायला मिळतोय. अशातच आत्ता पुण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुन्हा एकदा हेल्मेट सक्तीचं सूतोवाच केलंय. त्यांच्या या सूतोवाचाला आता पुणेकर नागरिकांचा विरोध सुरू झालाय.
पोलीस आयुक्तपदी अमितेश कुमार : पुणे शहराचे तत्कालीन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची पदोन्नती झाली असून त्यांच्या जागी आता अमितेश कुमार यांची पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झालीय. अमितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी बोलताना त्यांनी हेल्मेट सक्ती बाबत सूतोवाच केलंय.
पदभार स्वीकारताच अॅक्शन मोडमध्ये अमितेश कुमार : पदभार स्वीकारताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, "हेल्मेट घालणं अनिवार्य आहे. तसा कायदा देखील आहे आणि कायद्याचं पालन झालंच पाहिजे. तसंच पुण्यात गुन्हेगारी कमी करण्याला प्राधान्य राहील, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगची वाढती प्रकरणं पाहता कोयत्याचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करणार असून बेसिक पोलिसिंग, व्हिजीबल पोलिसिंग, लॅा ॲंड ॲार्डर यावर विशेष भर राहील. शहरातील वाहतुकीची समस्या, महिला बाल सुरक्षा, व्हीआयपी सिक्युरिटी, सायबर गुन्हे देखील आपल्या कामकाजातील महत्वाचे मुद्दे असतील," असं त्यांनी सांगितलं.
पुण्यात हेल्मेट सक्तीला नेहमी विरोध : राज्यात मागील काही दिवसांपासूंन मोठ्या प्रमाणात अपघात वाढले आहेत. यासोबतच पुण्यातही अपघातात वाढं झालीय. यात हेल्मेट नसल्यानं मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हे वाढते अपघात रोखण्यासाठी तसंच अपघातात मृत्यूचं प्रमाण कमी व्हावं यासाठी हेल्मेट घालण्याचा कायदा करण्यात आलाय. मात्र, पुण्यात हेल्मेट सक्तीला नेहमी विरोध झालाय. या विरोधात पुणेकरांनी रस्त्यावर उतरुन आंदोलनंही केली होती. मात्र, नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हेल्मेट घालणे अनिवार्य असल्याचं सांगितल्यानं आत यावर पुणेकर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :