मुंबई Ameen Sayani Passed Away : 'सोनेरी आवाजाचा जादूगार' म्हणून सुपरिचित असलेले ख्यातनाम रेडिओ निवेदक अमीन सयानी यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. 'बिनाका गीतमाला' या आकाशवाणीवरील कार्यकर्माद्वारे अमीन सयानी यांनी जगभरातील श्रोत्यांना भुरळ घातली होती. त्यांचा 'बिनाका गीतमाला' का कार्यक्रम तब्बल पाच दशकं श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत होता. चित्रपटसृष्टीतील आघाडीचे नायकही अमीन सयानी यांच्या जादुई आवाजांचे रसिक होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून अमीन सयानी यांना वार्धक्याशी संबंधित आजारांनी ग्रासलं होतं. त्यातच त्यांचं निधन झालं. रेडिओ निवेदनाला खऱ्या अर्थाने वलय प्राप्त करुन देणाऱ्या अमिन सयानी यांनी आपल्या निवेदनकलेने देश-विदेशातले स्टेज शोज सुद्धा गाजवले.
'बिनाका गीतमाला' कार्यक्रम पोहोचला घराघरात : सुप्रसिद्ध निवेदक अमीन सयानी यांनी रेडिओ सिलोन आणि त्यानंतर विविध भारतीच्या माध्यमातून आपल्या जादुई आवाजानं श्रोत्यांच्या मनावर पाच दशकं अधिराज्य गाजवलं. त्यांचा 'बिनाका गीतमाला' हा कार्यक्रम अगदी घराघरात मोठ्या उत्सुकतेनं ऐकला जायचा. श्रोते 'बिनाका गीतमाला' या कार्यक्रमाची मोठ्या आतुरतेनं वाट पाहायचे. ''बहनों और भाईयों," ही अमीन सयानी यांच्या खर्जातल्या आवाजातली साद ऐकली की श्रोते अक्षरशः आपल्या रेडिओसमोर सरसावून बसत. अमीन सयानी यांनी संगीतरसिकांच्या चार पिढ्यांमध्ये स्मरणरंजन (nostalgia) जागा ठेवला.
मृत्यूच्या पसरल्या अफवा : सुप्रसिद्ध निवेदक अमीन सयानी यांना दीर्घ आजारानं ग्रासल्यानं त्यांची प्रकृती नाजूक होती. 21 डिसेंबर 2023 ला अमीन सयानी यांनी आपला 90 वा वाढदिवस साजरा केला. मात्र त्यानंतर त्यांच्या मृत्यूच्या अफवा मोठ्या प्रमाणात सोशल माध्यमांवर व्हायरल होत होत्या. त्यांच्या मृत्यूच्या अफवा पसरवल्या जात असल्यानं त्यांच्या मुलानं या अफवांचं खंडन केलं होतं. मात्र "आज सकाळी मुंबईतील एका रुग्णालयात अमीन सयानी यांनी अखेरचा श्वास घेतला," अशी माहिती अमीन सयानी यांचा मुलगा राजिल सयानी यांनी दिली आहे.
अमिताभ बच्चन यांना दिला होता नकार : 'बिनाका गीतमाला' या कार्यक्रमातून अमीन सयानी यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. अगदी मेलोडियस अंदाजात त्यांनी आवाजाचा बादशाह म्हणून नावलौकिक मिळाला. मात्र चित्रपटसृष्टीत आजच्या घडीला 'बिग बी' म्हणून नावाजलेले अमिताभ बच्चन यांचं रेडिओ जॅकी बनण्याचं स्वप्न होतं. त्यासाठी अमिताभ बच्चन हे मुंबईत आले होते. मुंबईत आल्यानंतर त्यांनी अमीन सयानी यांची भेट घेण्याचं ठरवलं. मात्र अमीन सयानी यांनी अमिताभ बच्चन यांना त्यांच्या 'जाड्या भरड्या' आवाजामुळं न भेटताच नकार दिला होता. अमीन सयानी यांच्यामुळं अमिताभ बच्चन यांचं रेडिओ जॅकी होण्याचं स्वप्न भंगलं आणि भारतीय चित्रपटसृष्टीला 'महानायक' मिळाला.
हेही वाचा :