अकोला Fake Police Arrest : बारावीमध्ये शिकणाऱ्या बहिणीला २१ फेब्रुवारी रोजी परीक्षा केंद्रावर कॉपी पुरविण्यासाठी आलेल्या एका भावाला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. विशेष म्हणजे, हा भाऊ पोलिसांच्या गणवेशात पातुर तालुक्यातील शाहबाबू उर्दू हायस्कूल परीक्षा केंद्रावर आला. त्यानं पोलीस अधिकाऱ्याला सॅल्युट मारल्यानंतर त्याचं बिंग फुटलं. पोलिसांनी तोतया पोलिसाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून इंग्रजी विषयाचं गाईड जप्त केलं. पोलिसांनी त्याला आज न्यायालयात हजर केलं आहे.
कॉपी पुरवण्यासाठी केंद्रांवर धडपड: सध्या बारावीचे पेपर सुरू आहेत. पेपरमध्ये कुठल्याही प्रकारची कॉपी होऊ नये, म्हणून पूर्णपणे खबरदारी घेण्यात येत आहे. परीक्षा केंद्रांवर कॉपी पुरविण्यासाठी अनेकांची गडबड सुरू आहे. परंतु, पोलिसांचा कडा पहारा आणि विविध पथकांद्वारे सुरू असलेल्या धडक मोहिमेमुळे ते शक्य होत नसल्याचं चित्र आहे. असं असतानाही एका भावानं मात्र, बहिणीला परीक्षा केंद्रावरच कॉपी पुरवण्याचा प्रकार केला आहे.
सॅल्युटची पद्धत पाहून अधिकाऱ्याला आला संशय: पातुर तालुक्यातील शाहबाबू उर्दू हायस्कूलवर इंग्रजी विषयाचा पेपर सुरू होता. या पेपरला कॉपी पुरविण्यासाठी अनेकांची गडबड सुरू होती. मात्र, पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्यानं कॉपी पुरविणं शक्य होत नव्हतं. शेवटी एक तरुण बहिणीला कॉपी पुरविण्यासाठी थेट पोलिसांच्या वेशात आला. परीक्षा केंद्रावर आल्यावर त्यानं तिथं उपस्थित अधिकाऱ्याला पाहून सॅल्युट मारला. त्याचा सॅल्युटचा प्रकार पाहून पोलिसही चक्रावले. त्याची चौकशी केली असता तो तोतया पोलीस निघाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक इंग्रजी विषयाचं गाईड सापडलं. पोलिसांनी त्याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्याला अटक केली. पोलिसांनी त्याला न्यायालयात आज हजर केलं.
परीक्षा केंद्रावर सॅल्युट मारणारा तोतया पोलीस हा पोलीस भरतीची तयारी करतोय, असं त्यानं सांगितलं. तसंच त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडं एक गाईड सापडलं आहे. यावरून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयातही हजर करण्यात आलं आहे. -- किशोर शेळके, पोलीस निरीक्षक, पातूर पोलीस ठाणे
पोलीस भरतीची करीत होता तयारी : तोतया पोलीस बनून आलेला तरुण हा पोलीस भरतीसाठी तयारी करीत होता. तो रोज नियमित सकाळी व्यायाम आणि पोलीस भरतीसाठीच्या लेखी परीक्षेचा अभ्यासही करीत होता. मात्र, खरा पोलीस बनण्याआधीच तोतया पोलीस झाल्यानं त्याचं पोलीस होण्याचं स्वप्नदेखील भंगलं आहे.
हेही वाचा:
- Fake Police Arrested In Mumbai: कुरिअरमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगत लुबाडणाऱ्या तोतया पोलिसांच्या सुत्रधारास अटक
- Pune Crime News : प्रेयसीला खुश करण्यासाठी बनला बनावट पोलीस, चतुशृंगी पोलिसांकडून आरोपीला अटक
- Mumbai Fraud News: पानटपरीतून फुकटेगिरी करणारा तोतया पोलीस गजाआड, 'त्या' एका चुकीमुळे पोलिसांना आला होता संशय