नागपूर/ बीड BJP Vs MLA Jitendra Awhad : महाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका आंदोलना दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. या घटनेनंतर भाजपासह अजित पवार गटाचे नेते आक्रमक झाले आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या कृतीच्या निषेधार्थ आज नागपुरात भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी तीव्र आंदोलन करत निषेध नोंदवला. यावेळी भाजपाच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांना पुतळा जाळण्यापासून पोलिसांनी रोखले असता काहीवेळ गोंधळ निर्माण झाला होता.
भाजपा अनुसूचित जाती मोर्चातर्फे आंदोलन : जितेंद्र आव्हाड यांची कृती अनावधानाने नाही तर पूर्ण सावधानतेनं करण्यात आलेली आहे. आव्हाड यांना अटक केली पाहिजे. तसंच शरद पवार यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलं पाहिजे, अशी मागणी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे. भाजपा नेते धर्मपाल मेश्राम आणि माजी आमदार मिलिंद माने यांच्यातर्फे हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनात भाजपाचे माजी आमदार मिलिंद माने यांच्यासह अनुसूचित जातीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं केलं दहन : शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात बीडमध्ये भाजपा आक्रमक झालीय. बीडमध्ये भाजपा कार्यालयाबाहेर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वात भाजपाचे पदाधिकारी रस्त्यावर उतरले. यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. तर जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. आव्हाड केवळ चर्चेत राहण्यासाठी असं विधान करतात. दरम्यान पक्षाने जितेंद्र आव्हाड यांचा आमदार पदाचा राजीनामा घेऊन पदापासून दूर करावं, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
नांदेडमध्ये जोडे मारो आंदोलन : नांदेडमध्ये आव्हाड यांच्या पुतळ्याला भाजपाने जोडेमारो आंदोलन केलं. आव्हाड यांनी चवदार तळ्यावर जाऊन मनुस्मृती दहन करत आंदोलन केलं. या आंदोलनात आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं छायाचित्र फाडलं. या घटनेचा निषेध करत भाजपाने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले. नांदेड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आव्हाड यांनी संपूर्ण देशाचा अपमान केला आहे. त्यांच्या कृत्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी भाजपाने केलीय.
हेही वाचा :