नागपूर Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांना कथित दारू धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीनं गुरुवारी रात्री अटक केली. केजरीवाल यांच्या अटकेनंतर देशभरात आपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. केजरीवाल यांच्या अटकेचा देशभरात निषेध होत आहे. तसंच या अटक कारवाईचे पडसाद आता नागपूरसह राज्यातल्या शहरात उमटताना दिसत आहेत.
अटेकच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी : काल रात्रीपासूनच आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. सुरुवातीला भाजपा कार्यालयाजवळ आंदोलन करणार असल्याचं आप पक्षानं जाहीर केलं होतं. मात्र त्यानंतर मोठ्या संख्येनं जमलेल्या कार्यकर्त्यांनी तिथेच न थांबता थेट नितीन गडकरी यांच्या निवडणूक प्रचार मुख्यालयात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र या कार्यालयापासून शंभर मीटर अंतरावर पोलिसांनी त्यांना रोखले असता, या आंदोलकांनी संताप व्यक्त करत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. आप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी पाहून पोलिसांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या प्रयत्नांना फारसं यश न आल्यानं पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना अटक करून आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केला.
भाजपा मुख्यालयाबाहेर आंदोलन : या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकारसह भाजपाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दिल्लीत अचानक झालेली कारवाई ही हुकूमशाही, सत्तेचा गैरवापर असल्याचा आरोप आप कार्यकर्त्यांनी केला आहे. या कार्यकत्यांनी हातात हिटलरचा फोटो धरून या कारवाईचा निषेध केला. सध्या या आंदोलकांना नितीन गडकरी यांच्या कार्यालयापासून 100 ते 200 मीटर अंतरावर रोखून धरलं जात आहे. मात्र, 'आप'चे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमत असल्यानं पोलिसांच्या वतीनं या ठिकाणी चोख बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात आपचे कार्यकर्ते आक्रमक : आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा देशभरात निषेध होत आहे. या अटकेचे पडसाद महाराष्ट्रातही उमटत आहेत. पुण्यातही आप पक्षासह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यालयाबाहेर निदर्शनं केली. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केलाय. आंदोलनासाठी परवानगी घेतली नसल्याचं सांगत पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना अटक केल्याची घटना निषेधार्ह असल्याचं सांगितलं. देशात लोकसभा निवडणूक होणार असून त्यासाठी ही अटक करण्यात आली आहे. देशाची वाटचाल हुकूमशाहीकडं होत असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे.
रास्ता रोको नाशिकमध्ये : नाशिकमध्ये मेहेर सिग्नल परिसरात रास्ता रोको करण्यात आला. यावेळी टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. कोल्हापुरातही आप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. आपचे कार्यकर्ते थेट भाजपा कार्यालयाकडं कूच करत होते. मात्र यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अटक केली. कोल्हापुरातील महावीर कॉलेज चौकातून आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यालयात जाऊन आंदोलन केलं. कोल्हापूर पोलिसांनी त्यांना बळाचा वापर करण्यापासून रोखलं आहे. यावेळी पोलीस, कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. पोलिसांनी आंदोलकांना बळजबरीने उचलून गाडीत नेलंय. यावेळी आप कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
हे वाचलंत का :
- अरविंद केजरीवाल यांना अटक: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'कर्माची फळं भोगतायत' - Anna Hazare News
- अरविंद केजरीवालांची ईडी मागणार 10 दिवस कोठडी?; आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात - ED Arrested Arvind Kejriwal
- निवडणुकीचं काम नको रे बाबा! 'इलेक्शन ड्यूटी' रद्द करण्यासाठी विविध कारणं घेऊन कर्मचारी निवडणूक विभागात - Lok Sabha Elections 2024