चंद्रपूर Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाल्याचं बघायला मिळतंय. याच अनुषंगानं चंद्रपूर सीमेवर स्थायी निगराणी पथक (एसएसटी) तैनात करण्यात आलंय. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज (24 मार्च) पाटाळा (ता. भद्रावती) येथील पथकांची पाहणी केली. तसंच यावेळी त्यांनी सीमेवरील पथकांना जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची कडक तपासणी करण्याचे निर्देश दिले. यावेळी वरोराच्या उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे, उपविभागीय पोलिस अधिकारी नयोमी साटम, तहसीलदार योगेश कौटकर (वरोरा), अनिकेत सोनवणे (भद्रावती) उपस्थित होते.
सूचना काय? : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात 16 मार्च 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेवर स्थायी निगराणी पथक (एसएसटी) तैनात करण्यात आले आहे. पाटाळा (ता. भद्रावती) येथील पथकांची पाहणी करतांना जिल्हाधिकारी गौडा यांनी सूचना दिल्या. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची कडक तपासणी झाली पाहिजे. यात कोणताही निष्काळजीपणा करू नये. चारचाकी वाहनाच्या डीक्कीसह वाहनाच्या सीटजवळील भागसुध्दा तपासावा. यात असणाऱ्या बॅग्ज आणि इतर बाबींची तपासणी करावी. काही आक्षेपार्ह आढळल्यास त्याबाबत संबंधित यंत्रणेला माहिती द्यावी. पूर्णपणे खात्री झाल्यावरच संबंधित वाहनाला प्रवेश द्यावा. तसंच तालुक्यातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी रात्री-बेरात्री चेकपोस्टवर अकस्मिकपणे भेट द्यावी, असे निर्देश गौडा यांनी दिले.
पुढं ते म्हणाले की, "संपूर्ण जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि नि:पक्षपणे राबविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबध्द आहे. आदर्श आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणी तसंच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात विविध पथकांचं गठन करण्यात आलंय. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्ह्याच्या सीमेवर तैनात स्थायी निगराणी पथकांनी (एसएसटी) जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची कडक तपासणी करावी", असंही ते म्हणाले.
चेकपोस्टला दिली आकस्मिक भेट : यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी वरोरा–वणी मार्गावरील पाटाळा आणि वणी येथील चेकपोस्टला भेट दिली. किती जणांची टीम लावण्यात आली?, प्रत्येक टीममध्ये किती लोकांचा सहभाग असतो?, प्रत्येक शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांचं वेळापत्रक कसं आहे?, आदी बाबींची माहिती यावेळी त्यांनी जाणून घेतली. तसंच दोन्ही चेकपोस्टवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकमेकांना मोबाईल क्रमांक देऊन ठेवावे, जेणेकरून एखादे वाहन न थांबता सुसाट गेले आणि संशयास्पद वाटले तर त्याची माहिती लगेच दुसऱ्याला माहिती देणं शक्य होईल, असंही गौडा यांनी सांगितलं.
वरोरा येथे स्ट्राँग रुमची पाहणी : तत्पूर्वी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी वरोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात असलेल्या स्ट्राँग रुमची पाहणी करून या परिसराला बॅरिकेटींग करावे, तसंच स्ट्राँग रुम सुरक्षेच्या दृष्टीनं पोलीस विभागानं विशेष दक्ष रहावं, अशा सूचना दिल्या.
मतदारसंघनिहाय तैनात असलेले एसएसटी पथक : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 62 स्थायी निगराणी पथकांचे (एसएसटी) गठन करण्यात आले आहे. यात राजुरा विधानसभा मतदार संघात 15, चंद्रपूर–4, बल्लारपूर–6, वरोरा – 12, वणी – 13 तर आर्णी विधानसभा मतदारसंघात 12 पथकांचा समावेश आहे. याशिवाय गडचिरोली लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघात 8 तर चिमूर मतदारसंघात 4 एसएसटीचे गठण करण्यात आलंय.
हेही वाचा -
- लोकसभा निवडणूक 2024 : 3000 शतकपार वयोवृद्ध मतदारांचा कौल कुणाला याची उत्सुकता... - Thane Lok Sabha Constituency
- अमरावती लोकसभा निवडणूक : आमच्या समोर सर्व पर्याय खुले; अभिजीत अडसूळ यांचा गर्भित इशारा - Amravati Lok Sabha Elections
- नाशिक लोकसभा मतदार संघातून चार बाबा निवडणूक लढण्यास इच्छुक - Trimbakeshwar Akhara Parishad