मुंबई Renuka Shahane On Marathi Artist : दुसरीकडे मराठी भाषेवर अन्याय होत असताना मराठी कलाकार मात्र चिडीचूप शांत बसले आहेत. कुठलंही मत नाही, भूमिका नाही, साधं ट्विटही नाही. यामुळं कलाकारांच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. संयुक्त महाराष्ट्रासाठी 105 हुतात्म्यांना बलिदान द्यावे लागले. यानंतर मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आता संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला जवळपास 64 वर्ष पूर्ण होत असताना महाराष्ट्रात आणि मुंबईत अजूनही मराठी भाषेवर अन्याय होणं, मराठी उमेदवाराला नोकरीसाठी डावलणं किंवा मराठी कुटुंबाला घर न देणं आदी प्रकार वारंवार घडत आहेत. या आधीही मुंबईत असे कित्येकवेळा प्रकार घडले आहेत. हे पुन्हा एकदा घडत असल्यामुळे ही एक शोकांतिका आणि दुर्दैव आहे. असा संताप मराठी माणसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मोजकेच कलाकार समोर : मुंबईत मराठी विरोधी घडलेल्या घटनानंतर जेव्हा माध्यमातील प्रतिनिधींनी फोन करून याबद्दल कलाकारांना मत विचारलं तेव्हा मोजक्याच कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या. मात्र अनेक कलाकारांनी माहिती पाठवा, माहिती घेऊन सांगतो, परत फोन करतो, आता बिझी आहे नंतर फोन करा अशी कारणे देत वेळ मारून नेली. एकीकडे स्वतःहून भूमिका घ्यायची नाही. पण ज्या रेणुका शहाणे यांनी भूमिका घेतली, किमान त्यांच्या पाठीशी उभे राहणे किंवा त्यांचे कौतुक करणे हे मराठी कलाकारांकडून अपेक्षित होतं; मात्र दुर्दैवाने हेसुद्धा होताना दिसले नाही. मोजक्याच कलाकारांनी शहाणे यांना समर्थक देत पाठिंबा दिला आहे. यामध्ये अभिनेत्री आदिती सारंगधर, अभिनेता अतुल तोडणकर, शुभांगी गोखले, चिन्मय सुर्वे, मंगेश देसाई, नंदेश उमप आदी कलाकारांनी पाठिंबा दिला आहे; मात्र मराठीतील अनेक प्रसिद्ध आणि दिग्गज कलाकारांनी याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. यामुळं लोकांमधूनही संताप व्यक्त करण्यात येत असून, जेव्हा मराठी भाषेला, मराठी माणसाला या कलावंताची गरज असते तेव्हा हे शांत कसे बसतात? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
मग यांचे चित्रपट आम्ही का पाहावे? : अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी परखड भूमिका घेत मतदारांना आवाहन केलं. त्या पद्धतीने अन्य कलाकारांनी काय केले नाही? कलाकारांनी मूग गिळून गप्प का आहेत? शांत का आहेत? असा प्रश्न मुंबईकर विचारताहेत. 'मग अशा कलाकारांचे आम्ही पैसे काढून थेटअरमध्ये सिनेमा, चित्रपट का पाहिला जावा? असं मुलुंडमध्ये राहणारे आप्पा वाघमारे यांनी म्हटलं आहे' तर 'जेव्हा मराठी माणसांवर. मराठी भाषेवर अन्याय होतो, तेव्हा विविध क्षेत्रातील लोकांनी यावर भूमिका घेतली पाहिजे आणि स्वाभाविकपणे सिनेसृष्टीतील कलाकारांनीही यावर मत मांडलं पाहिजे, असं फोर्टमध्ये राहणारे मंगेश कांबळे यांनी म्हटलं आहे'. दुसरीकडे 'काही कलावंत हे आपले नुकसान होईल. आपण बोलल्यामुळे आपल्याला कोणी इव्हेंट देणार नाही किंवा त्याचा फटका आपल्या सिनेमाना बसेल, आपले नुकसान होईल असं वाटत असल्यामुळं संकुचित वृत्ती बाळगून आपले भले आणि आपले काम भले असं म्हणताहेत, असं अंधेरीत राहणारे संदेश खेडेकर यांनी म्हटलं आहे. 'एकीकडे मराठी माणसांनी थेटअरमध्ये चित्रपट पाहण्यास यावा अशी अपेक्षा मराठी कलाकार बाळगत असताना, जेव्हा मराठी भाषेवर अन्याय होतो. तेव्हा मात्र हे मराठी कलाकार शांत का राहतात? हाच खरा प्रश्न आहे. मग पैसे मोजून यांचे चित्रपट मराठी माणसाने कशासाठी बघायला जावे, असं खेदानं म्हटलं जात आहे.
म्हणून कलाकार शांत? : आपण जर एखाद्या विषयी भूमिका घेतली आणि समाजात मत मांडले, तर त्याला जसा पाठिंबा मिळेल तसा विरोध होण्याचीही शक्यता असते आणि आपण एक कलाकार आहोत. कोणा एकाची बाजू घेणे हे आपल्यासाठी योग्य नाही. याचा फटका आपला सिनेमावर बसू शकतो. परिणामी आपले आर्थिक नुकसान होऊ शकते. ही भावना कलाकारांमध्ये असल्यामुळे ते कोणत्याही विषयावरती उघडपणे मत मांडू शकत नाहीत. त्यांना काही मर्यादा आहेत, म्हणून ते शांत बसतात का? असा सवालही विचारला जात आहे.
ट्रोलर्सच्या भीतीमुळे : हल्ली सोशल मीडियाच्या युगात, फास्ट झालेल्या डिजिटायझेशनमध्ये एखादी गोष्ट आपण बोललो किंवा सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर त्यावर अनेकांचे मतमतांतर असते. यामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रोल व्हावं लागतं. ट्रोलर्सच्या भीतीमुळे अनेक कलाकार भूमिका घेत नाहीत, व्यक्त होत नाहीत, असं सिनेतज्ञ दिलीप ठाकूर यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना म्हटलं आहे. कलाकारांनी जर एखादी भूमिका घेतली किंवा आपलं मत मांडलं तर त्यांचा चाहता वर्ग नाराज होण्याची शक्यता असते. हा चाहता वर्ग आपल्या नाटकाकडे किंवा सिनेमाकडे पाठ फिरवेल; परिणामी आपलेच नुकसान होईल अशी भीतीही कलाकारांना वाटत असते. या कारणामुळे कलाकार भूमिका घेत नसल्याचं दिलीप ठाकूर यांनी म्हटलं आहे. एखाद्या कलाकाराने जर भूमिका घेतली तर ती भूमिका अनेकजण समजून न घेता त्याला विरोध करतात. मग ही उगाच नसती कटकट कशाला गळ्यात बांधून घ्यायची? अशी वृत्तीही अनेक कलाकारांची आहे. यामुळं कलाकार भूमिका घेत नाहीत किंवा आता जो मराठीवरून वाद सुरू झाला आहे, त्यावर ते व्यक्त होत नसल्याचं दिलीप ठाकूर यांनी सांगितले आहे.
कलाकारांनी बोललं पाहिजे : मुळात अशा घटना घडतात हे अत्यंत चुकीचं आहे. आपल्या महाराष्ट्रात मराठी माणसाला नोकरीसाठी डावललं जातं किंवा मराठी भाषेचाच प्रचार करू दिला जात नाही हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. कुठल्याही राज्यातील तिथल्या भूमिपुत्रांना डावलणं हे अयोग्य आहे. यावर विविध क्षेत्रातील लोकांनी भूमिका मांडली पाहिजे आणि मराठी कलाकारांनी ही भूमिका मांडली पाहिजे, असं "ईटीव्ही भारत"शी बोलताना निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते मंगेश देसाई यांनी म्हटलं आहे. जेव्हा आपल्या महाराष्ट्रात अशा घटना घडतात तेव्हा संयुक्त महाराष्ट्रचा निर्मिती करण्यासाठी ज्या 105 जणांना बलिदान द्यावे लागले, त्यांचा हा अपमान आहे. महाराष्ट्रात मराठी माणसाला नोकरी न देणे किंवा प्रचार करायला न देणे, हे दुर्दैवी आहे, असे होता कामा नाही यावर सर्वांनी भूमिका घेतली पाहिजे. त्याचबरोबर कलाकारांनी व्यक्त झालं पाहिजे, असं "ईटीव्ही भारत"शी बोलताना गायक नंदेश उमप यांनी म्हटलं आहे.
राजकीय वॉर सुरू : रेणुका शहाणे यांनी भूमिका घेतल्यानंतर यावर भाजपाकडून टीका करण्यात आली आहे. रेणुका शहाणे हा गुणी अभिनेत्री आहेत आणि त्यांच्या आम्हीही चाहत्या आहोत. पण मतांसाठी आवाहन करणाऱ्या रेणुका शहाणे यांची टाइमिंग पाहता यातून काही राजकीय हेतू साध्य करायचं आहे का? असा सवाल भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. तर चित्रा वाघ यांच्या टीकेला शिवसेना (ठाकरे गटाच्या) उपनेता सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रतिउत्तर देत चित्रा वाघ यांना "लेडी सोमय्या" असा उल्लेख करत टीका केली आहे. त्यामुळे रेणुका शहाणे यांनी घेतलेल्या भूमिकेवरून राजकीय वॉर सुरू झाले आहे. दुसरीकडे मराठी मुद्द्यावर नेहमी आक्रमक भूमिका घेणाऱ्या राजकीय पक्षांनी देखील या दोन घटनावर कोणतीही भूमिका मांडली नाही, उलट मतांसाठी मराठी मुद्दा उकरून काढला जात आहे, असं म्हणत यातून या पक्षांनी हात झटकले आहेत.
हेही वाचा:
- उद्धव ठाकरेच 'मविआ'चे स्टार प्रचारक, ठाकरेंच्या सभांना राज्यभरात मागणी - Lok Sabha Election 2024
- देशात 'या' धर्माच्या लोकसंख्येत तब्बल 'इतकी' वाढ; जनगणनेशिवाय केलेले दावे अयोग्य म्हणत नागरिकांच्या तिखट प्रतिक्रिया - Religion Count Report
- अरविंद केजरीवाल यांना 'सुप्रिम' दिलासा; सर्वोच्च न्यायालयानं दिला अंतरिम जामीन, लोकसभेचा प्रचारही करणार - Interim Bail To Arvind Kejriwal