नवी मुंबई Mukhyamantri Ladki Bahin Yojana: महानगरपालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त महिलांनी ‘मुख्यमंत्री–माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घ्यावा यादृष्टीनं नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेचा महिलांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासह 8 विभाग कार्यालय क्षेत्रातील 111 प्रभागांमध्ये कार्यान्वित करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत 6 हजारहून अधिक महिलांनी अर्ज दाखल केले असून 31 ऑगस्ट अर्ज भरण्याची मुदत आहे.
प्रसारमाध्यमातून प्रसिद्धी : शहरात मोक्याच्या ठिकाणी योजनेचे बॅनर्स प्रदर्शित करण्यात आले असून मोठे होर्डींग आणि डिजीटल होर्डींग याव्दारेही योजनेची माहिती प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तसंच वर्तमानपत्रांसह फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यू ट्यूब, व्हॉट्सॲप अशा समाज माध्यमांतूनही योजनेची माहिती प्रसारित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कचरा संकलन करण्यासाठी शहरातील गल्लोगल्ली दररोज जाणा-या घंटागाड्यांवरही ध्वनीफितीव्दारे योजनेचा व्यापक प्रचार केला जात आहे आणि एनएमएमटी बसेसमधील ध्वनीक्षेपक यंत्रणेवरूनही योजनेची माहितीची ध्वनीफित प्रसारित केली जात आहे.
450 आशा वर्कर कार्यरत: यासोबतच समाजविकास विभागाकडील समूह संघटक आपापल्या नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील महिला बचत गटांपर्यंत पोहचून त्यांना योजनेची माहिती देत आहेत. त्यांचे अर्जही भरून घेत आहेत तसंच त्यांच्यामार्फत त्या परिसरातील इतर महिलांपर्यंत पोहचून त्यांचेही अर्ज भरून घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.अशाच प्रकारे महानगरपालिकेच्या 450 हून अधिक आशा वर्करही आपल्या कार्यक्षेत्रातील घरांपर्यंत पोहचून तेथील महिलांमध्ये योजनेविषयी जनजागृती करीत आहेत.
नारीशक्ती दूत ऍपच्या माध्यमातून भरले फॉर्म: या योजनेचे ऑनलाईन अर्ज ‘नारीशक्ती दूत’ ॲपवरुन भरले जात असून ऑफलाईन अर्जही दाखल करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मदत कक्षांची वेळ सकाळी 8 ते दुपारी 2 तसेच दुपारी 2 ते रात्री 8 अशी असून हे सातही दिवस सुरू ठेवण्यात आले आहेत. तरी योजनेच लाभ घेण्याकरिता पात्र महिलांनी नारीशक्ती दूत ॲपव्दारे स्वत: अर्ज करावा अथवा महानगरपालिकेने सुरू केलेल्या नजिकच्या मदत कक्षाला भेट देऊन अर्ज दाखल करावा असं आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
हेही वाचा