मुंबई Abhishek Ghosalkar Murder Case : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येला 40 दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र आतापर्यंत या हत्ये संदर्भात योग्य दिशेनं तपास होत नाही. राज्य सरकार कोणत्याही पद्धतीची मदत करत नाही, असा आरोप घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी आणि त्यांचे वडील विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांनी केलाय. आज मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये हा आरोप करण्यात आला.
सरकार असंवेदनशील : या संदर्भात राज्य सरकार अत्यंत असंवेदनशील आहे. स्वतः गृहमंत्री यांनी यासंदर्भात वक्तव्य करताना गाडीखाली श्वान आला तरी गृहमंत्र्यांना राजीनामा मागतील असं म्हटलं होतं. तर उदय सामंत यांनी हा ठाकरे गटातील अंतर्गत वाद असल्याचं म्हटलं होतं. छगन भुजबळ यांनी एकमेकातील भांडणात गोळीबार होत असेल तर पोलीस आणि मंत्री काय करणार असं असंवेदनशील वक्तव्य केलं होतं. याचा आपण निषेध करत आहोत आणि यावरून सरकारची भूमिका स्पष्ट होते असा आरोप, विनोद घोसाळकर यांनी केलाय.
तिसरी व्यक्ती होती का : या प्रकरणातील अमरेंद्र मिश्रा याने मॉरिसला गन दिल्याचं प्रथमदर्शनी दिसून येतं. मॉरिस आणि अभिषेक यांच्यातील मतभेद मिश्राला माहीत होते. ज्या लॉकरमध्ये गन होती, ते लॉकरला तोडण्यात आलं नव्हतं. म्हणजे तो लॉकर मॉरिसला उघडता येत होतं हे स्पष्ट होतं. या संदर्भातील अनेक फुटेज आम्ही पोलिसांना दिली आहेत. मात्र, त्यांनी त्याचा योग्य तपास केला नाही. मॉरिसची आत्महत्या झाली त्यावेळेस लाईट बंद झाली होती आणि अभिषेकला गोळी मारणारी व्यक्ती दिसत नाही. त्यामुळं या प्रकारात कदाचित तिसरी व्यक्ती असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करावा, अशी वारंवार मागणी करत असल्याचं घोसाळकर यांनी सांगितलंय.
न्यायालयात मागणार दाद : या प्रकरणाला 40 दिवस पूर्ण झाले आहेत. 90 दिवसात जर आरोप पत्र दाखल झाले नाही, तर त्याचा फायदा आरोपीला होऊ शकतो. त्यामुळं या संदर्भात आपण न्यायालयात दाद मागणार आहोत. तसंच या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करावी अशी मागणी, विनोद घोसाळकर यांनी केली.
हेही वाचा -