मुंबई Abhishek Ghosalkar Funeral : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली असून, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली आहे. राज्य सरकार आणि गृहमंत्र्यांना कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यास अपयश येत असल्याची टीका विरोधकांनी केली. दरम्यान अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव त्यांच्या बोरीवलीतील निवासस्थानी आणण्यात आलं आहे. त्यामुळे या परिसरात त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे.
राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता : अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येतोय. अभिषेक घोसाळकर हे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि ठाकरे गटाचे प्रमुख नेते होते. ते सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात चांगलेच सक्रिय होते. त्यामुळे त्यांच्या अशा मृत्यूनंतर राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.
आज दुपारी अंत्यसंस्कार : मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवावर आज (शुक्रवार, 9 फेब्रुवारी) दुपारी बोरिवली इथं अंत्यसंस्कार होणार आहेत. गुरुवारी रात्री उशिरा अभिषेक घोसाळकर आणि मॉरीस नरोना यांचे मृत्यूदेह शविच्छेदनासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात आणण्यात आले. यानंतर आज अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची अंत्ययात्रा दुपारी तीन वाजता त्यांच्या निवासस्थानातून सुरु होईल. दौलत नगर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अंत्यदर्शनासाठी पोहचले : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. ते दुपारी 2 वाजताच्या सुमारास अभिषेक घोसाळकर यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहचले. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. अभिषेक घोसाळकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी राजकीय क्षेत्रातील मोठे नेते उपस्थित राहणार असल्याचं बोललं जातं आहे.
हे वाचलंत का :