मुंबई Vinod Ghosalkar Statement : माझा मुलगा अभिषेकची विश्वासघातानं निर्घृण हत्या करण्यात आली. हा माझ्या कुटुंबावरील मोठा आघात आहे. आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशावेळी अश्लाघ्य आणि बिनबुडाचे आरोप करून माझी, माझ्या मुलाची आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा हिडीस प्रकार सुरू आहे. (Ghosalkar Family) असे खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत. माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी तत्काळ थांबवावी, असं निवेदन शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते विनोद घोसाळकर यांनी जारी केलं आहे.
आमची बदनामी थांबवा: शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची बोरिवलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर घोसाळकर यांच्याबाबत आक्षेपार्ह बाबी पसरवल्या जात आहेत. एका निवेदनाद्वारे अभिषेक यांचे वडील विनोद घोसाळकर यांनी हा किळसवाणा प्रकार थांबवण्यासाठी बजावलं आहे. त्यांनी म्हटलं की '१९८२ पासून मी राजकारणात सक्रिय आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के राजकारण आणि २० टक्के समाजकारण या सूत्राचं तंतोतंत पालन करत आहे. मी आणि माझा पुत्र अभिषेक आम्ही निरपेक्षपणे, निष्ठेनं राजकारण आणि समाजकारण केलं. शिवरायांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत. निष्कलंकपणे आम्ही सामाजिक जीवनात वावरत आहोत. कोणताही डाग आमच्यावर नाही. मी मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलो. त्यानंतर विधानसभेवर निवडून गेलो. मुलगा अभिषेक, सून तेजस्वी हेसुद्धा नगरसेवक म्हणून निवडून आले. जनतेचं प्रेम आणि विश्वास आम्हाला मिळाला. त्याला आम्ही कधीही तडा जाऊ दिला नाही. जनतेची आम्ही नि:स्वार्थपणे सेवा केली", असं घोसाळकर यांनी निवेदनात नमूद केलं.
अभिषेकची विश्वासघात करून हत्या: "माझा मुलगा अभिषेकची विश्वासघातानं झालेली हत्या हा आमच्यावरील मोठा आघात आहे. आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशावेळी अश्लाघ्य असे बिनबुडाचे आरोप करून आमचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. आमच्या बदनामीचा हिडीस प्रकार सुरू आहे. ही बदनामी कृपा करून तत्काळ थांबवा, अशी माझी कळकळीची विनंती आहे. आम्ही काही गुन्हा केला असेल आणि त्याचे पुरावे असतील तर खुशाल तक्रार नोंदवा. पण खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत. दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्यावर होत असलेले आरोप म्हणजे मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा किळसवाणा प्रकार आहे, अशा तीव्र भावना घोसाळकर यांनी निवेदनात व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा: