कोल्हापूर : Youth Festival In Shivaji Vidyapith : कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवांतर्गत देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरातील 75 लोकवाद्य वादनाचा महोत्सव भरवण्यात आला होता. विद्यापीठाच्या चारही दिशांना त्या त्या प्रदेशातचं प्रतिनिधित्व करणारी लोकवाद्यांचं प्रदर्शनही भरवण्यात आलं. या शिवस्पंदन कार्यक्रमांतर्गत आणि विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीनं विद्यापीठाच्या वाद्य कलाकारांनी वाजवलेल्या देशभरातील 75 लोकवाद्याच्या निनादात शिवाजी विद्यापीठाचा परिसर दुमदुमून गेला.
75 लोकवाद्य : शिवाजी विद्यापीठात विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या तीनदिवसीय शिवस्पंदन महोत्सवात विद्यापीठातून सर्वच अधिविभाग सहभाग घेतात. विविध लोकनृत्य, गायन, समूहगीत तसेच विशेष लोकवाद्य महोत्सव आणि प्रदर्शन पार पडले. यामध्ये देशभरातील 75 लोकवाद्यांच्या वादनाचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली असं मत विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. पी. टी. गायकवाड यांनी व्यक्त केलं.
चारही दिशांना देशातील चार भागांतील वाद्य : देशाच्या चार दिशांकडील राज्यांतील वाद्यं विद्यापीठाच्या परिसरात चार दिशांना वाजविण्याचा हा उपक्रम आहे. त्यानुसार, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील हिरवळ, क्रांतीवन परिसर, संगीत आणि नाट्यशास्त्र अधिविभागाशेजारील तलाव व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यासमोरील हिरवळ या चार ठिकाणी हे वादन सादरीकरण करण्यात आलं. दरम्यान, सभागृहात पार पडलेल्या 75 वाद्यांच्या वादनाच्या अनोख्या आणि उत्साही सोहळ्याला विद्यापीठातील असंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. तर, एकत्र सादरीकरणात कलाकार विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रीयन, पंजाबी, आसामी, साउथ इंडियन, बंगाली अशा अनेक भाषांमध्ये लोकगीते सादर केली आणि त्या भागातील लोकवाद्यांचं वादन करून दाखवलं.
शिवाजी विद्यापीठातील या लोकवाद्य कलाकारांचा सहभाग : कलाशिक्षक दीपक बिडकर, संदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली वाद्य कलाकार शंतनू पाटील, ऋषिकेश देशमाने, नितीन शिंदे, तेजस गोविलकर, गणेश इंडीकर, मयुरेश शिखरे, अभय हावळ, सुजल कांबळे, कौस्तुभ शिंदे, अनिकेत देशपांडे, प्रशिक कांबळे, प्रतीक जाधव, सुमंत कुलकर्णी, हर्षदा परीट, सूरज कांबळे, धीरज खोत, अक्षय कडोले, पृथ्वीराज माळी यांनी सहभाग घेतला.
प्रदर्शन आणि वादनात ही होती वाद्य : ढोलकी, ढोलक, पखवाज, खोळ, घटम, गंजिरा, खंजिरी, दिमडी, हलगी, पराई, शाहिरी डफ, डफ, डफड, फायबर हलगी, खमक, बुगचू, भपंग, चौंडकं, डमरू, इडक्का, डवर, उडुक्काई, बगलबच्चा, दड्ड, छिंद, डहाका, उरुमी, याकबेर, थाविल, पंबई इसाई, मोडा, कोट्टू, ताशा, चंडा, तुलूनाडू थासे, चेंडा, तबला, संबळ, सनई, बासरी, सुन्द्री, शंख, खालू सनई, नादस्वरम, तोटा, तुणतुणे, तुंबी, मोरसिंग, गोंगाणा, एकतारी, दामलाई डुमलाई, खालुबाजा, खालूची टिमकी, ढोल, पुणेरी ढोल, धनगरी ढोल, पंजाबी ढोल, कच्ची ढोल, थमरू, मोंदल, मुरासू, थापढोल किंवा डोल, नगारा, चौघडा, मांदल, डुग्गी, काटो, तिबेटियन बाऊल किंवा गाँग, इडतालम, खैताळ, घाटी, खुळखुळा, झांज, चिमटा, घुंगरू, करताल, मंजिरी, लेझीम, घोळकाटी, टाळ, चिपळी, घंटा, बडुंगडुप्पा, साप, भोरताल, झेंगाट, बिहू ढोल, बंगाली ढोल, ढाक, पहाडी मांदल अशी वाद्य त्या ठिकाणी होते.
हेही वाचा :
1 आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल; शिवजयंतीला वाघाची शिकार केल्याचं वक्तव्य भोवलं
3 मिटकरींनी दिलेलं चॅलेंज आव्हाडांनी स्वीकारलं; मात्र, 'तुतारी' वाजवण्यासाठी ठेवली अट