अमरावती Library in Nandgaon Peth : जेमतेम शिक्षण घेतलेले तरुण आता कामाला लागलेत. तर काही तरुण व्यसानाच्या आहारी जाऊन आता वेगळ्याचं मार्गावर आहेत. परंतु, हे ग्रंथालय सुरू झाल्यानंतर आता मुलं इकडं वाचनासाठी, तसंच, आपल्या पुढील शिक्षणाच्या दृष्टीनं या ग्रंथालयाच्या माध्यमातून अभ्यास करत आहेत. दरम्यान, हळूहळू या ग्रंथालयात पुस्तकांची संख्या वाढली आहे. ग्रंथालयाला लागूनच टीन आणि बासे उभारुन अभ्यासिका सुरू झाली. पाच-सहा वर्षांच्या या प्रवासात गावातील मुलं नेट सेट आणि पीएचडी व्हायला लागली आहेत. अमरावती शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या नांदगाव पेठ या छोट्याशा गावात अभ्यासाबाबत विद्यार्थ्यांमध्ये आलेली जागरुकता आणि आता इतरांप्रमाणं आपण देखील अभ्यास करुन, मोठं होऊ शकतो ही जिद्द पूर्ण करण्यासाठी सुरू झालेले प्रयत्न अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असेच आहेत.
अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी झाला प्राध्यापक : नांदगाव पेठ परिसरात राहणारे गणेश ज्ञानेश्वर पोकळे यानं अमरावतीच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक इथून प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर बुलडाणा येथून इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन या विषयात अभियांत्रिकीची पदवी मिळवली. यानंतर आपल्याला अधिकारी व्हायचं, असं स्वप्न रंगवून आपल्या गावात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. अनेक पुस्तकं विकत आणली. घराच्या आवारातच ग्रंथालय सुरू केलं आणि आपल्यासोबत गावातील विद्यार्थ्यांनाही अभ्यासासाठी येण्याचं आवाहन केलं. (दि. 31 ऑगस्ट 2017)ला सुरू झालेल्या त्याच्या या ग्रंथालय आणि अभ्यासिकेमध्ये पहिल्या वर्षी एक मुलगा आणि चार मुली असे पाच जण येत होते. हे सगळे मिळून अभ्यास करायला लागले.
आम्हालाही नवी वाट मिळाली : या काळात गणेश पोकळे यांनी मराठी आणि इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. विशेष म्हणजे गणेशनं मराठी विषयात विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत तिसरं स्थान पटकावलं. (2022)मध्ये नेट परीक्षा उत्तीर्ण करुन जे. आर. एफ अर्थात संशोधनासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून संशोधन वृत्ती देखील त्याला मिळायला लागली. यासोबतच अमरावती शहरातील विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालयात तासिका तत्वावर तो मराठीचा प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवत देखील आहे. खरंतर स्पर्धा परीक्षेसाठी सुरू केलेली तयारी प्राध्यापक आणि संशोधनाच्या दिशेनं गेली. "आम्ही अभ्यासाला सुरुवात केल्यामुळेच आम्हालाही नव्या वाटेनं जाता आलं," अशी भावना गणेश पोकळे यानं 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.
आतापर्यंत सात जण यशस्वी : सुरुवातीला पाच ते सहा जणांमध्ये सुरू झालेल्या या अभ्यासिकेमध्ये आज नांदगाव पेठ या गावातील 25 ते 30 विद्यार्थिनी नियमित अभ्यासासाठी येतात. या विद्यार्थिनींकडून कुठलंही शुल्क वसूल केलं जात नाही. स्वतः गणेश पोकळे यानं या अभ्यासिकेतून अभ्यास करुन नेट सेट उत्तीर्ण करुन जे. आर. एफ मिळवली आहे. त्याच्यासह गायत्री मुळे हिनंदेखील नेट सेट उत्तीर्ण करुन जे. आर. एफ मिळवली. राधिका कुऱ्हाडे या विद्यार्थिनीनं देखील नेट उत्तीर्ण केलं असून तिला देखील जे. आर. एफ मिळाली आहे. वैष्णवी मुळे, कविता नेवारे यांनी नेट उत्तीर्ण केलं असून स्नेहल मुळे ही सेट झाली आहे. तर, समीक्षा मुळे ही याच अभ्यासिकेतून अभ्यास करुन अमरावती ग्रामीण पोलीस दलामध्ये भरती झाली आहे.
शेजारच्या गावांमधून यायला लागलेत विद्यार्थी : नांदगाव पेठ येथील या अभ्यासिकेत अभ्यास करुन विद्यार्थी यशस्वी व्हायला लागलेत. शेजारच्या गावातून देखील पालक आपल्या पाल्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं, या उद्देशानं नांदगाव पेठ इथं भाड्यानं खोली करुन अभ्यासासाठी पाठवायला लागले आहेत. विशेष म्हणजे या अभ्यासिकेत मुलींचीच संख्या अधिक आहे. कोणाला प्राध्यापक व्हायचं आहे, तर कोणाला शासकीय सेवेत नोकरी मिळवायची असून, त्या दिशेनं या विद्यार्थिनी दिवसभर अभ्यास करत आहेत.
घरी अडचण, ग्रंथालयात वाव : "आमचं घर छोटेसं आहे. घरात अभ्यास करताना खरंच अडचणी येतात. घरातील सदस्यांसह शेजारच्या लोकांचा आवाज देखील येतो. अशा परिस्थितीत घरात व्यवस्थित अभ्यास होणं शक्य नाही. या अभ्यासिकेत आल्यावर इथल्या शांत वातावरणात चांगला अभ्यास होतो," असं या ठिकाणी नियमित अभ्यासासाठी येणाऱ्या गायत्री मुळे या विद्यार्थिनींनं 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
विद्यापीठातील प्राध्यापकांकडून मदत : आपल्या मराठी विभागातील विद्यार्थी गावात ग्रंथालय आणि अभ्यासिकेद्वारे आपल्यासह इतर विद्यार्थ्यांना देखील शिक्षणाबाबत जागृत करत आहे. त्यामुळे विद्यापीठातील मराठी विभागातील प्राध्यापकांनी देखील या विद्यार्थ्यांच्या ग्रंथालयासाठी मदत केली आहे. विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील पुस्तकांमधून नोट्स काढायच्या असतील किंवा काही प्रिंट काढायच्या असतील, तर प्राध्यापक डॉ. माधव पूटवाड यांनी या ग्रंथालयासाठी प्रिंटर उपलब्ध करुन दिलं आहे. या अभ्यासिकेमध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारे मासिक वृत्तपत्र तसंच अनेक विषयाचे ग्रंथ उपलब्ध आहेत.
हेही वाचा :
१ प्रेयसीसाठी कायपण! कामगारांच्या 'पीएफ'चे पैसे पाठवले प्रेयसीच्या खात्यावर; पर्यवेक्षकाला अटक
२ नाशिकमध्ये डॉक्टरवर तरुणाचा प्राणघातक हल्ला; कोयत्यानं 15 ते 18 वार करुन आरोपी फरार
३ बारामती लोकसभेत नणंद-भावजय लढत; खासदार सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...