मुंबई - Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 च्या महाराष्ट्राच्या संग्रामातील पहिल्या टप्प्यातील मतदानाचा दिवस जवळ येत आहे. मात्र, अद्यापही महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये आता टोकाचे मतभेद पाहायला मिळत आहेत. सांगलीतील काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम हे सतत दिल्ली वाऱ्या करत असून राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशीही ते चर्चा करत आहेत. या जागेवर ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी एकत्र येत त्यांचा प्रचार करावा असं आवाहन सातत्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत नेमकं चाललय काय? आघाडीत बिघाडी आहे का? अशा चर्चा सुरू आहेत. याच चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंगळवारी महाविकास आघाडीचे संयुक्त पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नरिमन पॉइंट येथील ठाकरे गटाच्या शिवालय या संपर्क कार्यालयात महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे, शरद पवार व काँग्रेसचे नेते देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "ज्या ज्या मतदारसंघात तिढा होता तो आता सुटलेला आहे. त्यामुळे उद्याचा शुभ दिनी आमची 11 वाजता शिवालाय येथे संयुक्त पत्रकार परिषद पार पडतेय. याला उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले आदी नेते उपस्थिती असतील. आमच्यात बिघाडी काही नाही. उलट त्यांच्यात अद्याप काहीच ठरलं नाही. आम्ही कशा प्रकारे पुढे काम करणार याविषयी उद्या माहिती देऊ."
काँग्रेसने सांगलीतील जागेवर अद्यापही दावा सोडलेला नाही. विश्वजीत कदम सातत्याने या जागेवर दावा करत आहेत. याबाबत बोलताना खासदार राऊत म्हणाले की, "कार्यकर्त्यामुळे नेत्यांना थोडं झुकावं लागतं. त्यामुळे काही ठिकाणी हे वाद पाहायला मिळाले. पण, कोणीही टोकाची भूमिका घेत नाही. उद्या आम्ही यावर सर्व सविस्तर बोलू. काहीही मतभेद नाहीत. नाना पटोले, वडेट्टीवार हे काँग्रेस पक्षाची भूमिका मांडत आहेत. याबरोबरच महाविकास आघाडीची देखील भूमिका मांडत आहेत," अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
दुसरीकडे भाजपा प्रचाराच्या मैदानात उतरलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. चंद्रपुरात त्यांची प्रचार सभा होणार आहे. "दहा वर्षा नंतरही यांना मतं मागण्यासाठी यावं लागतं. ही भाजपसाठी शोकांतिका आहे. उत्तर प्रदेशमध्ये परिस्थिती चांगली नाही. योगी आदित्यनाथ यांनी खरं तर तिकडे लक्ष द्यायला हवं. तरीही हे इथे येतायत. हे कोड ऑफ कंडक्टच उल्लंघन आहे," असं खासदार संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा -
एकनाथ खडसे करणार भाजपा प्रवेश; चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली 'ही' प्रतिक्रिया - Lok Sabha Election 2024