अमरावती Bus Crushed Child : अमरावती मध्यवर्ती बस स्थानक ते सायन्स कोर मैदान परिसरात रस्त्याने जाणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांना भरधाव वेगात येणाऱ्या शहर बसने चिरडले. या अपघातात नऊ वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच अंत झाला तर इतर तिघे गंभीर जखमी आहेत. या घटनेमुळे मध्यवर्ती बस स्थानक परिसरात रविवारी सकाळी खळबळ उडाली.
असा झाला अपघात : अमरावती मध्यवर्ती बस स्थानकासमोर सायन्स कोर मैदानालगत बडनेरा ते अमरावती रेल्वे स्थानक दरम्यान धावणाऱ्या शहर बसला रस्त्यावरच थांबा देण्यात आला आहे. शहर बससह ऑटोरिक्षा या ठिकाणी मोठ्या संख्येने उभ्या असतात. आज सकाळी शिरजगाव कसबा येथील रहिवासी असणारे निर्मळे कुटुंबातील तीन नातवंड आजीसह अमरावतीत एका सत्संगाच्या कार्यक्रमानिमित्त आले होते. यावेळी सायन्स कोर मैदानासमोर भरधाव येणाऱ्या शहर बसचे ब्रेक फेल झाले आणि या बसने निर्मळ कुटुंबातील चौघांना चिरडले. या अपघातात प्रीतम गोविंद निर्मळे हा नऊ वर्षांचा चिमुकला जागीच ठार झाला. तर त्याची आजी नर्मदा निर्मळे (60 वर्षे), चुलत बहीण वैष्णवी संजय निर्मळे (14 वर्षे) आणि नेहा संतोष निर्मळे हे तिघे जण अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शहर बसची तोडफोड : या अपघातानंतर अमरावती मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील जमावाने शहर बसची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा सायन्स स्कोर मैदानासमोर दाखल झाला. पोलिसांनी शहर बस चालकाला अटक केली आहे. या घटनेनंतर बराच वेळ पर्यंत अमरावती मध्यवर्ती बस स्थानक तसेच सायन्स कोर मैदानाच्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त होता.
हेही वाचा :
- लाइव्ह ठाण्यात विद्युत बॉक्सची चोरी करताना विजेचा धक्का लागून मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद - Breaking News in Marathi
- डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाल्यानं पंतप्रधानांसह राहुल गांधींनी व्यक्त केला निषेध, वाचा काय म्हणाले? - Donald Trump News
- मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात: भरधाव ट्रक दुभाजक तोडून कारवर आदळल्यानं कारमधील चार जण ठार - Accident On Mumbai Agra Highway